कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

139

कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का, यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कोकण भूमी प्रतिष्ठानच्या ‘मी मुंबई अभियान’ अंतर्गत ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, संजय शिरसाठ, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, आयोजक संजय यादवराव आदी उपस्थित होते. नेस्को सेंटर, गोरेगाव येथे आयोजित हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.

(हेही वाचा – आमदारांचा जीव टांगणीला; मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय नेतृत्त्वाकडून लाल सिग्नल?)

शिंदे म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला दिशा आणि गती देण्याचे काम केले जात आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी उपलब्ध आहे. काजू, आंबा, मत्स्यव्यवसाय यांच्यासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कोकणचे वैभव जपणे सर्वांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊनच कोकणासाठी विविध पर्यावरणपूरक योजना, प्रकल्प, उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.

लहरी हवामानामुळे कोकण किनारपट्टीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यातून सावरण्याचे बळ देण्याबरोबरच स्थानिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचेही ते म्हणाले. तरूणांना रोजगार उपलब्ध करून कोकणचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार – फडणवीस

कोकण ही नररत्नांची खाण आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे दर्शन होत असून येत्या काळात अधिक चांगल्या आणि पर्यावरणपूरक योजना राबवून कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

“कोकणातला आंबा अधिक गोड की माणूस” असा प्रश्न पडतो अशा शब्दांत कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाचे कौतुक करून फडणवीस म्हणाले, बंदरे, मासेमारी, विविध उद्योग, पर्यटन विकासासह स्थानिकांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा महोत्सव म्हणजे कोकणच्या समृद्धी आणि विकासासाठी आवश्यक व्यक्तींचे एकत्रित संमेलन असून राज्य शासन कोकणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.