शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी होणार ‘या’ तारखेला!

182

महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट, या दोन गटातील सत्ता संघर्षावर 7 डिसेंबर रोजी प्रस्तावित असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वातील 5 सदस्यीय खंडपीठापैकी एक न्यायमूर्ती बुधवारी उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 13 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

( हेही वाचा : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांनी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, पहा क्षणचित्रे)

सर्वोच्च न्यायालयाने नोटीसद्वारे केले स्पष्ट 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील प्रकरण ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मात्र न्यायमूर्ती कृष्ण मुरारी उपलब्ध होणार नसल्याने सुनावणी होऊ शकणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे. शिवसेना नेमकी कोणाची..? या मुद्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरविला.

त्यानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासंबधीची याचिका दाखल करण्यात आली होती. याच संदर्भात 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. परंतु तेव्हाही ही सुनावणी लांबणीवर पडली होती. यावेळी ठाकरे गटाकडून वैधानिकदृष्या हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असताना आणि महाराष्ट्रातील सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असताना यावर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी 13 जानेवारीला होईल असे स्पष्ट केले आहे. 13 जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रकासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.