मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा आंबिवली मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने या मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकलची वाहतूक खोळंबली होती. ही घटना बुधवारी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडली. या तांत्रिक बिघाडामुळे कसारा ते टिटवाळा जाणाऱ्या आणि येणाऱ्या ट्रेन प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे त्या भागातील आसनगाव, वाशिंद, अटगाव, खर्डीसह टिटवाळा स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे दिसून आले.
(हेही वाचा – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणाबाबत वनमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय)
मध्य रेल्वेच्या मार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या या बिघाडामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी होती. या झालेल्या गोंधळाचा फटका बसल्याने काही प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला तर काहीना लेटमार्क देखील लागला.
दरम्यान, झालेल्या या तांत्रिक बिघाडाबाबत रेल्वे प्रशासनाने माहिती देणे अपेक्षित होते, परंतु वेळेवर माहिती न दिल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली होती. झालेल्या सिग्नल बिघाडाची २५ मिनिटांनी दुरुस्ती झाल्यानंतर रेल्वे वाहतूक हळुहळु पूर्ववत झाली. मात्र, त्यामुळे कल्याण-कसारा मार्गावरील लोकल वाहतूक सकाळच्या सत्रात अर्धा तास विलंबाने सुरू असल्याने कल्याण, डोंबिवली स्थानकात मोठ्या गर्दीला प्रवाशांना सामोरे जावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.
Join Our WhatsApp Community