नांदेड येथून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी पहाटे ८ ते १० जणांच्या टोळीने दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना कसारा ते कल्याण दरम्यान घडली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने ८ दरोडेखोरांना अटक केली असून त्यात दोन दरोडेखोर अल्पवयीन आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड, औरंगाबाद येथून दादर चैत्यभूमी येथे शेकडो आंबेडकर अनुयायी दर्शनासाठी निघाले ५ डिसेंबर रोजी देवगिरी एक्स्प्रेसमधून निघाले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता देवगिरी एक्स्प्रेस कसारा रेल्वे स्थानकातून कल्याणच्या दिशेने निघाली असता आरक्षण एस-२ आणि एस- १ या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना ८ ते १० जणांच्या एका टोळीने चाकूचा धाक दाखवत, मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल फोन आणि किमती ऐवज लुटले.
(हेही वाचा – ऐन गर्दीच्या वेळी ‘मध्य रेल्वे’ची वाहतूक विस्कळीत, मुंबई लोकलच्या प्रवाशांचा खोळंबा)
१७ ते २५ वयोगटातील या दरोडेखोराच्या हातात असलेले घातक शस्त्रे असल्यामुळे प्रवाश्यांनी जिवाच्या भीतीपोटी या टोळीला विरोध केला नाही, त्याचा फायदा घेत ही टोळी दुसऱ्या डब्ब्यात गेली. दरम्यान कल्याण रेल्वे स्थानक येताच काही प्रवाश्यांनी कल्याण स्थानकावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांना दरोड्याची माहिती दिली. रात्री बंदोबस्ताला असलेले कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडेखोरांना शोधण्यास पाठविले. तसेच ठाणे लोहमार्ग पोलिसाना संपर्क साधत देवगिरी एक्स्प्रेसही ठाणे रेल्वे स्थानकात येताच ठाणे आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ डब्यातून दरोडेखोरांचा शोध घेत आठ जणांच्या टोळीला ताब्यात घेऊन दादर रेल्वे स्थानकावर उतरवून कल्याण येथे आणले.
रोहित जाधव (२१), विलास लांडगे (२६), कपिल उर्फ प्रकाश निकम (१९), करण वाहने (२३), राहुल राठोड (१९), निलेश चव्हाण (१९) आणि दोघे अल्पवयीन असे एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी मूळची औरंगाबाद येथे राहणारी असून त्यांच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे असल्याची माहिती वपोनी. ढगे यांनी दिली. ही टोळी औरंगाबाद येथून प्रत्येक डब्ब्यात गरीब आणि दर्शनासाठी दादर येथे निघालेल्या प्रवाश्यांकडून बळजबरीने पैसे काढत होती अशी माहिती समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community