गेले काही दिवस महाराष्ट्र-कनार्टक सीमावर्ती भागात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनूसार एसटी महामंडळाने कर्नाटकात जाणाऱ्या दैनंदिन १ हजार १५६ फेऱ्यांपैकी ३८२ फेऱ्या पुढील सूचना येईपर्यत अंशत: रद्द ठेवल्या आहेत.
( हेही वाचा : मुंबईतील ६० हजार फेरीवाल्यांचे पंतप्रधान स्वनिधीचे अर्ज मंजूर)
महाराष्ट्राच्या विविध विभागातून सुटणाऱ्या एसटी बसे नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिधुंदुर्ग या जिल्ह्यांतून कर्नाटक राज्यात जातात. यापैकी कोल्हापूरातून निपाणी-बेळगाव मार्गे जाणाऱ्या सुमारे ५७२ फेऱ्यापैकी ३१२ फेऱ्या स्थानिक जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत. तथपि, गडहिंगलज, चंदगड, आजरा, तळ कोकण व गोव्याला जाणाऱ्या बस फेऱ्या निपाणी ऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
तसेच सांगली जिल्ह्यातील कर्नाटक राज्यात जाणाऱ्या ६० फेऱ्यांपैकी २२ फेऱ्या स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य विभागातील संवेदनशील मार्गावरील ४८ फेऱ्या रद्द केल्याची माहिती एसटी प्रशासनातर्फे देण्यात आली.
‘ते’ भाविक सुखरूप
कोल्हापूर शहरातून श्री क्षेत्र सौंदत्ती येथे सुमारे ७ हजार भाविकांना घेऊन गेलेल्या १४५ एसटी बसेस बुधवारी मध्यरात्रीपर्यंत कोल्हापूरात सुखरुप दाखल होतील. या बाबतीत आवश्यकता वाटल्यास कनार्टक पोलीस प्रशासनाने संबधित बसेसना पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. बुधवारी दत्त जयंती निमित्त राज्यातील अनेक तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यायाच्या सीमावर्ती भागात कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे श्री.दत्त जंयतीनिमित्त यात्रा भरविण्यात आली आहे. या यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून सोलापूर-अक्कलकोट-गाणकापूर या मार्गावर जादा वाहतूक केली जात आहे. तेथे कोणतेही विघ्न आलेले नसून, यात्रा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.
Join Our WhatsApp Community