चंद्रपूरातील ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पात आठवड्याभरात सहा वाघांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच ब्रह्रपुरी येथील नागभिड भागांतही बुधवारी सकाळी वाघाचा मृतदेह वनाधिका-यांना आढळला. या वाघाच्या पाठीकडील भागाचा चावा घेऊन मांसही काढले गेल्याचे आढळले. प्रादेशिक वादावरुन दोन वाघांमध्येच एकमेंकावर हल्ला झाला, त्यात एका वाघाचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वनाधिका-यांनी काढला.
मृतदेहांवरील जखमा ताज्या असल्याने बुधवारी सकाळीच प्रादेशिक वादातून वाघाची हत्या झाल्याचे चंद्रपूर वनविभाग (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर माणकर यांनी सांगितले. अंदाजे अडीच वर्षांच्या वाघाचा मृतदेह असल्याचे बोलले जात आहे. परंतु वाघाची इतर ओळख मात्र मिळाली नाही. वाघाचा मृतदेह टेहाळणी पथकाला सकाळी अकराच्या सुमारास आढळून आला होता. या घटनेच्या अगोदरच काही महिन्यांची वाघाची पाच बछडी ताडोबा अंधेरीत नर वाघाकडून मारली गेली होती. त्यापैकी एका घटनेत तब्बल चार बछडी मारली गेली. नागभिड येथील घटनाही प्रादेशिक वादातूनच घडली, काही तासांतच टेहाळणी पथकाला याबाबतची माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेतला गेला, असे माणकर यांनी सांगितले.
( हेही वाचा: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द )
Join Our WhatsApp Community