शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना काल, बुधवारी दिवसभरात धमकीचे दोन फोन कॉल्स आल्याची माहिती समोर येत आहे. कर्नाटक सीमावादाविषयी शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाईंनी काल पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर संजय राऊतांना फोनवरून या धमक्या देण्यात आल्याचे सांगितले जात आहेत. संजय राऊतांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून हे धमकीचे फोन आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
(हेही वाचा – पुण्यात बनावट नोटांचा ‘खेळ’! ६ महिन्यांपासून सुरू होती नोटांची छपाई अन्…)
शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर चांगलाच निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत राऊतांनी चुकीचे वक्तव्य केल्याने शंभूराज देसाई आक्रमक झाले आणि त्यांनी राऊतांवर हल्लाबोल चढवला. राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीका करत हे सरकार नामर्द असल्याचे म्हटले होते.
या पत्रकार परिषदेत शंभूराज देसाईंनी राऊतांना थेट इशारा देत तोंड आवरून सीमावादावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करणे थांबावा, नाहीतर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. शंभूराज देसाईंच्या या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती मिळत आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई
शंभूराज देसाई म्हणाले, राऊतांनी वापरलेल्या या शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो. खुद्द संजय राऊत यांनाच बेळगाव न्यायालयाचे समन्स होते. तेव्हा न्यायालयाचे कवच असतानाही राऊत तिथे का गेले नाहीत, मग षंढ कोण असा प्रतिसवाल शंभूराज देसाईंनी राऊतांना विचारला आहे.
संजय राऊतांवर टीका करताना शंभूराज देसाई म्हणाले, मोठ्याने बोलायचं, बाह्या सावरून बोलायचं, ही पद्धत बोलायची कुणीही सहन करणार नाही. तुम्ही साडे तीन महिने आराम करून आला आहात. संजय राऊत तोंड आवरा. तुमच्या बडबडण्यावरून तुम्हाला बाहेरचं वातावरण सूट होत नाही असे दिसतेय. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, त्यामुळे अशी वक्तव्य करणे टाळावीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
षंढ हा शब्द संजय राऊतांनी वापरला. राऊत स्वतः कोण आहेत? ज्याला 15 दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या कोर्टाकडून समन्स आले होते. ते सुद्धा पूर्ण करण्याचे धाडस संजय राऊतांकडे नाही. न्यायालयाचे कवच असतानाही ते कर्नाटकात जायला घाबरले. ते केवढे मोठे षंढ आहेत, असे म्हणत राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंनी उत्तर दिले आहे.
Join Our WhatsApp Community