एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडी निराश झाली. ज्या कारणासाठी ही आघाडी झाली होती, ते कारणच संपले होते. शिंदे-फडणवीस सरकार तावडीत सापडत नव्हते. गद्दार वगैरे या गोष्टी काम करत नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या मुद्द्यानेदेखील सरकारवर फारसा फरक पडला नाही आणि मग अचानक सीमावाद पेटला. याविषयीचे राज ठाकरे यांचे मत लक्षात घेतले पाहिजे, “हा वाद कोर्टात आहे. मग अचानक हा वाद पेटवण्याचे कारण काय?
राज ठाकरे जे म्हणाले ते योग्यच आहे. मूळ विषयाकडे दूर्लक्ष होण्यासाठी मुद्दामून हा वाद पेटवण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी या वादाला तोंड फोडले आणि महाविकास आघाडीला आयता मुद्दा मिळाला. आता ज्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा प्रश्न स्वतःची दीर्घकाळ सत्ता असताना कधी सोडवता आला नाही, त्यांना हा प्रश्न दोन दिवसात सोडवायचा आहे. पण इतकी वर्षे आपण काय करत होतो? असा प्रश्न यांना पडत नाही आणि कुणी यांना विचारत देखील नाही.
कदाचित बोम्मई हे विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत म्हणून त्यांनी सीमावादाचा मुद्दा परत उकरुन काढला आहे. बी.एस.येडियुरप्पा यांनी बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिल्यानंतर आता कदाचित बोम्मई यांच्याकडे निवडणुकीसाठी मुद्दे कमी पडत असावेत. त्यामुळे त्यांच्या फायद्यासाठी पेटवलेला सीमाप्रश्राचा फायदा मात्र महाविकास आघाडीतले नेते उचलताना दिसत आहेत.
( हेही वाचा: पुण्यात बनावट नोटांचा ‘खेळ’! ६ महिन्यांपासून सुरू होती नोटांची छपाई अन्… )
स्वतः मुख्यमंत्री असताना घराचा उंबरठादेखील न ओलांडणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता बेळगावात जाण्याची आणि राज्य सांभाळण्याची भाषा करत आहेत. ही ताकद, ही ऊर्जा अचानक उद्धव ठाकरे यांच्यात संचारली आहे. सीमावादाचा फायदा बोम्मई यांना कसा होईल हे नंतर कळेलच, परंतु आघाडीला मात्र पालिकेच्या निवडणुकीसाठी आयता मुद्दा मिळाला आहे. भाजप-बाळासाहेबांची शिवसेना विकास व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार आहे, तर आघाडी अल्पसंख्याक आणि मराठी माणूस या मुद्द्यावर निवडणूक लढेल. थोडक्यात, सामना रंगणार आहे.
Join Our WhatsApp Community