नियोजित दौरा अचानक रद्द करणाऱ्या मंत्र्यांना दिव्यांगांनी हिसका दाखवला. त्यामुळे इतर कार्यक्रम रद्द करीत या मंत्र्यांना दिव्यांग सप्ताहात सहभागी व्हावे लागले. जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त नुकतीच अलिबागमध्ये अपंग कर्मचारी संघटनेची राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत निमंत्रित होते. या सर्वांकडून तारीख निश्चित झाल्यानंतरच कार्यक्रमाची आखणी करण्यात आली, निमंत्रण पत्रिकाही छापल्या. मात्र, आयत्यावेळी अन्यत्र कार्यक्रम निश्चित झाल्याने तिघेही नेते अपंग कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेला उपस्थित राहू शकणार नाही, असे कळवण्यात आले. त्यामुळे आयोजकांची गोची झाली. दिव्यांगांविषयी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी अशाप्रकारे दौरा रद्द केल्यामुळे संतापही व्यक्त करण्यात आला.
( हेही वाचा: Election Result 2022: गुजरातमध्ये भाजपची मजबूत स्थिती; हिमाचलसह इतर निवडणुकांची स्थिती घ्या जाणून )
अशी फिरली चक्रे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत अन्य मंत्र्यांनीही अचानक दौरा रद्द केल्याने संतप्त झालेल्या अपंग कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. निमंत्रण पत्रिकेत नावे असलेल्यांपैकी एकही जण हजर न राहिल्यास सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन हे सरकार दिव्यांगांच्या विरोधात असल्याचे जाहीर करू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर झपाट्याने चक्रे फिरली आणि दीपक केसरकर यांचा अलिबाग दौरा निश्चित करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community