गेल्या काही वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असताना, आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या एका युवा नेत्याला भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा सत्यजित तांबे यांनी मराठीत अनुवाद केला आहे. या अनुवादीत पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर आदि उपस्थित होते. या भर कार्यक्रमात फडणवीसांनी तांबे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली.
फडणवीसांची टोलेबाजी
या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, सत्यजित तांबे यांना मी अनेक वर्षांपासून बघत आलेलो आहे. राजकीय नेत्यांमध्ये जे वेगळेपण असते, ते सत्यजितमध्ये आहे. मंचावर उपस्थित बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, ‘बाळासाहेब तुमच्याकडे माझी एक तक्रार आहे. सत्यजित सारखे नेते, तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? सत्यजितला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसे जमाच करायची असतात’, अशी टोलेबाजी करीत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली.
(हेही वाचा समान नागरी कायदा म्हणजे स्त्रियांना अनेक पती करण्याचा अधिकार, जावेद अख्तरांनी तोडले अकलेचे तारे)
अजित पवारांनी येणे टाळले
सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवारही उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी दांडी मारली. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका मंचावर येणे टाळले की काय, अशाही चर्चा सुरू होत्या.