महापालिकेला या कारणांसाठी हवेय १९०० मेट्रीक टन मीठ

193

मनोरंजन वाहिन्यांवर ‘शुध्द नमक दे ना’ अशाप्रकारची जाहिरात सर्वांचे लक्ष वेधून घेत असले तरी या शुध्द नमक अर्थात मिठाची मागणी मुंबई महापालिकेच्या माध्यमातूनही केली जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून १९०० मेट्रीक टन शुध्द मिठाची खरेदी केली जाणार असून या मिठाचा वापर जलशुध्दीकरणानंतर पुढील प्रवाहामध्ये या पिण्याचे पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी केले जाते. त्यामुळे विविध जलाशयांमधून येणाऱ्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सुमारे दोन हजार मेट्रीक टनाच्या मिठाची मागणी केली असून एका मेट्रीक टनासाठी सुमारे आठ हजार रुपये मोजले जाणार आहे.

( हेही वाचा : मुंबई सुशोभिकरण योजनेतील ५० टक्के प्रकल्पांच्या कामांना उजाडणार जानेवारी, फेब्रुवारीचा महिना)

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर विविध भागांमध्ये असलेल्या जलाशयांमध्ये या पाण्याचा साठा केला जातो आणि या सेवा जलाशयांमधून या पाण्याचा पुरवठा विविध भागांमध्ये केला जातो. त्यामुळे जलाशयांच्या ठिकाणी विविध क्षमतेची इलेक्ट्रो-क्लोरीनेशनची यंत्रे बसवण्यात आली आहे. या इलेक्ट्रो- क्लोरीनेशच्या देखभालीमध्ये साधारण मिठाचा (कॉमन सॉल्ट) कच्चा माल म्हणून उपयोग केला जातो. या साधारण मिठाचे ब्राईन द्रावण तयार केले जाते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रो क्लोरीनेशन प्लांट ची देखभाल इलेक्ट्रोलिसीस तत्वावर केली जाते. त्यामुळे या ब्राईन द्रावणाचे इलेक्ट्रो क्लोरीनेशन यंत्राद्वारे विघटन होऊन क्लोरीनचे संयुक्त द्रावण तयार होते. या द्रावणाचा वापर पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरणा करण्यासाठी होतो.

मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या १८ जलाशयांसाठी इलेक्ट्रो क्लोरीनेशन यंत्रांकरता दोन वर्षांच्या कालावधीसाठी एकूण १९०० मेट्रीक टन एवढ्या ९९.५ टक्के शुध्द आणि ग्रेड वन आय.एस.मानांकनानुसार मिठाची खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. सुमारे दीड कोटी रुपयांच्या मिठाची खरेदी केली जाणार असून याकरता रविराज केमिकल्स ही कंपनी पात्र ठरली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.