कमलकांत यांची हत्या म्हणजे ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’

141

कमलकांत शहा या कापड व्यापाऱ्याची हत्या ही ‘कोल्ड ब्लडेड मर्डर ‘असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्वतःहून न्यायालयात मान्य केले आहे, कमलकांत यांची हत्या करणारे त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी थंड डोक्याने या गुन्हा केला, स्वतःच्या रक्ताची चाचणी करण्यापूर्वी आरोपी पत्नी हिने अगदी थोड्या प्रमाणात स्वतः देखील थेलियम हा विषारी धातू पाण्यातून घेऊन पोलीस आणि इतरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिने केल्याची कबुली तिने पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. अटकेत असलेल्या कविता उर्फ काजल शहा आणि हितेश जैन यांना गुरुवारी, ८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत १२ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

म्हणून कविता उर्फ काजल हिने थेलीयम घेतले  

सांताक्रूझ येथे राहणारे कापड व्यावसायिक कमलकांत शहा (४६) यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु असताना रक्ताच्या चाचणीत कमलकांत याच्या शरीरात प्रमाणापेक्षा खूप जास्त प्रमाणात आर्सेनिक आणि थेलीयम हे विषारी धातू आढळून आले होते. डॉक्टरांनी चिंता व्यक्त करून कमलकांत यांच्या कुटुंबियांनी देखील रक्ताची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु पत्नी कविता उर्फ काजल हिने स्वतःची रक्त चाचणी करण्यास नकार दिला होता, सहा दिवसांनी मात्र तिने स्वतःची रक्त चाचणी असता त्यात खूपच कमी प्रमाणात थेलियम आढळून आले होते. माझ्यावर संशय येऊ नये आणि पोलिसांची दिशाभूल व्हावी म्हणून मी स्वतः पाण्यातून कमी प्रमाणात थेलियम हे विष घेतले होते, त्यानंतर रक्त चाचणीसाठी गेले होते, अशी कबुली कविता उर्फ काजल हिने पोलिसांना दिली आहे.

(हेही वाचा Gujarat Assembly Election 2022 : भाजपने मोडला काँग्रेसचा ३७ वर्षांचा रेकॉर्ड)

कमलकांतच्या हत्येचा कट शिजला हॉटेलमध्ये

कविता उर्फ़ काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन हे दोघे कमलकांतच्या हत्येबाबत चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होते, हॉटलेमध्ये खोली घेऊन कमलकांतला कसे संपवायचे याचा कट रचत होते, पश्चिम उपनगरातील विविध हॉटेलमध्ये हे दोघे भेट होते व कमलकांत याच्या हत्येचा कट त्यांनी हॉटेलमध्येच रचला होता, कमलकांत याची थेट हत्या न करता त्याच्या खाण्यात विष देऊन त्याला हळूहळू संपावयचे असा कट या दोघांनी शिजवला होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. कमलकांत याच्या मृत्यूनंतर पकडले जाऊ नये म्हणून हितेश जैन याने आपला मोबाईल फोन आणि सिम कार्ड तोडून नाशिक महामार्गावर फेकून दिले होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. तसेच हितेश याने थेलियम हा विषारी धातू ऑनलाईन मिळविण्यासाठी गुगलवर सर्च इंजिनचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता, त्याचे सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. या पुराव्याच्या आधारे थेलियम आणि आर्सेनिक कुठून मिळविले याचा तपास पोलीस करीत आहे. कमलकांत याच्या हत्येसाठी या दोघांनी खूप थंड डोक्याने कट रचला होता. आपण पकडले जाऊ नये म्हणून या दोघांनी बरीच काळजी घेतली होती, या गुन्ह्यातील पुरावे एक एक करून दोघांनी नष्ट केल्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात कलम २०१ (पुरावा नष्ट करणे) हे वाढविण्यात आले आहे. या दोघांची पोलीस कोठडी गुरुवारी संपल्यामुळे दोघांना आज किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने या दोघांच्या पोलीस कोठडीत १२ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.