गुजरात-हिमाचल-दिल्ली निवडणूक निकाल; फक्त राहुल गांधी जिंकले, बाकी सगळे हरले!

158

एके दिवशी कॉंग्रेसचे युवराज पॉलिटिक्स पॉलिटिक्स खेळून खूप बोअर झाले. ते बर्‍याचदा फिरायला भारताबाहेर जातात. त्यामुळे भारत कळू शकला नाही. मग कदाचित त्यांच्या मनात असं आलं की आपल्याला भारतभ्रमण करता आलं पाहिजे आणि पॉलिटिक्स पण साधलं गेलं पाहिजे. एक तीर में दो शिकार. पिकनिकची पिकनिक होईल आणि राजकारणही होईल. मग त्यांचे जे एक्सपर्ट सल्ला देतात, त्यांनी खूप विचार केला आणि कदाचित यातून भारत जोडो यात्राची संकल्पना मांडली गेली असावी.

( हेही वाचा : श्री सिध्दीविनायक मंदिरातील श्रींच्या मूर्तींचे दर्शन बुधवारपासून पाच दिवसांसाठी बंद)

आता कॉंग्रेसचा सतत होणार पराभव पाहिला तर त्याचा दोष राहुल गांधी आणि एकंदर गांधी कुटुंबाकडे जातो. त्यामुळे दोष ज्याच्या माथ्यावर मारला जाईल असा माणूस त्यांचा शोधायचा होता आणि मग अखेर मल्लिकार्जून खरगे यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. देशभरातील विविध निवडणुकांपासून भारत जोडो यात्रा अलिप्त ठेवण्यात आली. निवडणुकीचा प्रचार म्हणून ही यात्रा काढली गेली नाही.

तर त्यामागे नॅरेटिव्ह असं सेट केलं होतं की, देश आता विखुरला जातोय, देशातील लोकांमध्ये द्वेष निर्माण होतोय आणि म्हणून भारताचं मानसिक विभाजन होतंय. त्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे आणि राहुल गांधी द्वेषाचं वातावरण संपुष्टात आणून प्रेमाचं वातावरण निर्माण करणार आहेत. परंतु निवडणुकांचे निकाल पाहता, राहुल गांधी लोकांना “आय लव्ह यू” म्हणत गेले, मात्र लोकांनी प्रतिसाद म्हणून “लव्ह यू टू” म्हटलं नाही. ही बिचार्‍या राहुल गांधी यांची शोकांतिका आहे.

तरी देखील मला प्रामाणिकपणे असं वाटतं की राहुल गांधी यांना कसलातरी साक्षात्कार झालाय. कसला झालाय माहित नाही. परंतु झालाय हे नक्की. त्यामुळे साक्षात्कार झालेला माणूस जय-पराजय याच्या पलीकडे गेलेला असतो. तो विजयाने उन्मत्त होत नाही आणि पराभवाने खचून जात नाही. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. लं. देशपांडे यांनी रंगवलेले एक विनोदी पात्र आहे. त्या पात्राचे नाव “अण्णू गोगट्या”. हा अण्णू गोगट्या अप्रत्येक निवडणुकीत पडतो तरी पुन्हा पुन्हा उभा राहतो. राहुल गांधी तसे आहेत. ते कितीही वेळा हरले तरी काही राजकारण सोडणार नाहीत.

म्हणून माझं म्हणणं आहे की गुजरात, हिमाचल किंवा दिल्लीच्या निवडणुकींचे निकाल काहीही लागो. त्याचा राहुल गांधींच्या मनावर काही परिणाम होणार नाही. ते बोअर झाले होते आणि कदाचित म्हणून भारत जोडो यात्रेची योजना आखली गेली. त्यांना त्यात आनंद मिळतो. मुलं, मुली, इतर लोक त्यांना प्रेमाने मिठी मारतात, त्यांना पाहुन ओव्हर ऍक्टिंग केल्यासारखे भावुक होतात, त्यांच्यासोबत चालतात, बोलतात या सर्व गोष्टींमध्ये राहुल गांधी यांना आनंद मिळतोय. आणि कोणत्याही निवडणुकीचे निकाल त्या आनंदावर विरजण घालू शकत नाहीत. म्हणून फक्त राहुल गांधी जिंकले, बाकी सगळे हरले!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.