मराठी मनोरंजन विश्वातून अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. साठ वर्षांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं शनिवारी दुपारी 12 वाजता निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी दुपारी 12 वाजाता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली असून वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुलोचना चव्हाण यांना भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी देखील त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना व्हील चेअर वरून आणण्यात आले होते.
(हेही वाचा – एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! १५० कोटी Twitter युजर्संना बसणार ‘हा’ फटका)
सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, कसं काय पाटील बरं हाय का? अशा शेकडो लावण्या ज्यांनी अजरामर केल्या असा संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज आज हरपल्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली झाला. अवघ्या चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुलोचना चव्हाण यांनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते गायिल्याने लावणी सम्राज्ञी असा लौकिक प्राप्त झाला. लावणी सम्राज्ञी हा किताब आचार्य अत्रे यांच्याकडून सुलोचना चव्हाण यांना देण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community