ठाण्यातील रुद्रांक्ष पाटीलची कौतुकास्पद कामगिरी! ठरला ‘जागतिक शूटर ऑफ द इयर’, ‘ गोल्डन टार्गेट ‘चा मानकरी

149

ठाण्यातील रुद्रांक्ष पाटीलने इजिप्तची राजधानी कैरोमध्ये झालेल्या प्रेसिडेंट कप या जागतिक अजिंक्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावत ठाण्याची मान जागतिक स्तरावर उंचावली आहे. रुद्रांक्ष पाटील ‘ जागतिक शूटर ऑफ द इयर ‘ तसेच ‘ गोल्डन टार्गेट’चा मानकरी ठरला आहे आणि त्यासोबतच त्याला १५ हजार डॉलरचे मानधनदेखील देण्यात आले आहे.

इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने पुरुषांच्या 10 मीटर रायफल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली आणि या विजयासोबतच त्याने 2024 मध्ये पॅरिस येथे होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात आपली जागा निश्चित केली.

इटलीच्या स्पर्धकाला हरवत सुवर्णपदकाची कमाई 

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर जागतिक रॅंकिंगमध्ये पहिल्या 12 मध्ये समावेश असलेल्या नेमबाजांना आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरशेनच्या अध्यक्षांनी निमंत्रित करुन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रुद्रांक्ष पाटीलने पात्रता फेरीत 360.1 गूण मिळवून सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. सेमी फायनलमध्ये ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूवर मात करत व संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवत त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्याची गाठ पुन्हा एकदा इटलीच्या डॅनिलो सोलार्जो याच्याशी झाली. डॅनिलो नुकत्याच झालेल्या जागतिक अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये रुद्रांक्षचा प्रतिस्पर्धी होता. शुक्रवारी डॅनिलोवर रुद्राशंने 16-10 ने मात केली.

( हेही वाचा: पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांनाही संधी, लवकरच लागू होणार ‘हे’ नवे नियम )

13 व्या वर्षी केली प्रशिक्षणाला सुरुवात

2015 मध्ये उन्हाळी शिबिंरात आईच्या सुचनेवरुन रुद्रांक्षने रायफल नेमबाजीचे वयाच्या 13 व्या वर्षापासून प्रशिक्षण घेतले. कोपरी येथील पीपल्स एज्युकेशन शाळेतील द्रोणाचार्य अकादमीत रायफल नेमबाजीचा रोज दोन ते तीन तास सराव त्याने केला. जर्मनीत झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेत दोन सुवर्ण, पेरु देशातील लिंमा शहरात गतवर्षी झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशीमध्ये रजतपदक, अशा सहा आंतरराष्ट्रीय पदकांसह 12 पदकांची त्याने आतापर्यंत कमाई केली आहे.

शैक्षणिकदृष्ट्या चांगलं करिअर असतानादेखील स्पोर्ट्स करिअर निवडून त्यात अव्वल कामगिरी करण्याचे त्याचे ध्येय होते आणि असणार आहे. त्याचदृष्टीने तो पुढे वाटचाल करत आहे. येणा-या ऑलिम्पिक्स खेळांमध्ये सुवर्ण कामगिरी करण्याची त्याची इच्छा आहे आणि त्यामुळे आताची वेळ ही त्याच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या या यशामागे एक संपूर्ण टीम आहे आणि त्या टीममधला मी एक सदस्य आहे. -पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील ( रुद्रांक्षचे  वडील)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.