‘हिंदु एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’च्या वतीने हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मान

175

यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवार, १० डिसेंबर रोजी ‘हिंदु एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’द्वारे आयोजित ‘पिलर्स ऑफ हिंदुत्व’ या संमेलनामध्ये विविध क्षेत्रात हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या प्रतिनिधींचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सद्गुरु श्री रितेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत संत, संपादक, अभिनेते, कलाकार, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख आणि राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

award1

‘हिंदू एज्युकेशन ॲड रिसर्च फाऊंडेशन’च्या संस्थापिका आणि वरिष्ठ पत्रकार डॉ. वैदेही ताम्हण यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. वैदेही ताम्हण यांनी लिहिलेल्या सद्गुरु श्री रितेश्वर महाराज यांच्या ‘लाईफ बियाँड कॉम्प्लिकेशन्स’ या जीवनचरित्राचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ‘भारत पूर्वीपासून आध्यात्मिक देश आहे. आत्मप्राप्ती करणे हे मनुष्यजीवनाचे सार्थक आहे, ही येथील संतांची शिकवण आहे. स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस यांनी साक्षात् परमात्म्याचे दर्शन घडवले. त्याप्रमाणे देशातील संत हे समाज आणि देश यांना दिशा दाखवून भारताला पुन्हा एकदा विश्वगुरु करतील.’

(हेही वाचा पाकिस्तानचा खोडसाळपणा; हिंदूंना हिंसक दाखवून बदनाम करणारी वेब सिरीज; ट्रेलरनंतर संतापाची लाट)

‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मानित मान्यवर!

विविध क्षेत्रांतील संत : पुणे येथील दत्तभक्त सद्गुरु नारायण महाराज, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, योगगुरु स्वामी कर्मवीर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भागवताचार्य स्वामी गिरीशनंद सरस्वती जी महाराज, मथुरा येथील महंत सीतारामदास निर्मोही गोवर्धन, हरिद्वार येथील महामंडलेश्वर डॉ. उमाकांतानंद सरस्वती, संत सोपानदेव समाधी संस्थान (सासवड) चे अध्यक्ष ह.भ.प. त्रिगुण महाराज गोसावी महाराज, व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे शिवदास सरजी महाराज (पुणे)

विविध क्षेत्रांतील मान्यवर : भक्तीसंगीतातील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, शास्त्रीय संगीतामधील प्रसिद्ध गायिका सुमा घोष, ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना आणि शरद पोंक्षे, भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते स्वप्नील जोशी.

विविध क्षेत्रांतील हिंदुत्वनिष्ठ : ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगड विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते भाजपचे आमदार नारायण सिंह चंडेल, अयोध्या रामजन्मभूमीचा खटला लढणारे अधिवक्ता हरिशंकर जैन, विश्व हिंदु परिषदेच्या केंद्रीय समितीचे दादा वेदक, राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके, ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी, सनातन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी, हिंदू एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, राष्ट्रकवी स्वामी ओम प्रकाश निडर आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रीती पांडे.

राज्यघटनेत ‘धर्म’ हा शब्द नाही. या शब्दासाठी ‘रिलीजन’ हा शब्द वापरण्यात आला आहे. ‘धर्म’ आणि ‘पंथ’ हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत, असे ‘ऑक्सफोर्ड’ शब्दकोषांतूनही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यघटनेत सनातन धर्माला राजाश्रय दिलेला नसल्याने शंकराचार्य, धर्माचार्य, धर्मविषयक विविध व्यवस्था आदी कुणालाच राजाश्रय नाही. राज्यघटनेत ‘सेक्युलर’ शब्द वापरण्यात आला आहे. ‘सेक्युलर’ हा शब्द लौकिक अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दांसाठी वापरला जातो; परंतु ‘धर्मनिरपेक्ष’ असे काही नसते. एक तर ‘धर्म’ असू शकतो किंवा अधर्म. त्यामुळे राज्यघटनेत ‘धर्म’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ या दोन्ही शब्दांचे अर्थ किंवा व्याख्या परिभाषित करण्यासाठी मागणी करणे आवश्यक आहे, असे सनातन संस्थेचे अध्यक्ष चेतन राजहंस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.