स्थूलतेमुळे आता कर्करोगासारखा जीवघेणा आजार होत असल्याबाबत वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. स्थूलता या चुकीच्या जीवनशैलीचा आजार असल्याने हा आजार वेळेवर नियंत्रणात आणायला हवा, असेही मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. देशात स्तन कर्करोगाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहे. या वाढत्या स्तन कर्करोगामागे स्थूलता हे प्रमुख कारण असल्याची माहिती परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ राजेंद्र बडवे यांनी दिली.
भारतात दरवर्षाला १ लाख महिलांना स्तन कर्करोगाचे निदान होत आहे. त्यापैकी ट्रिपल निगेटीव्ह या प्रकारातीन स्तन कर्करोगाची बाधा झालेल्या महिलांना वाचवणे वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान उभे राहिले आहे. भारतात ४५ ते ५० वयोगटातील महिलांना स्तन कर्करोग होत असल्याचे निरीक्षणाअंती दिसून आले आहे. या वयोगटातील ३० ते ४० टक्के महिलांना स्तन कर्करोगाचा त्रास होतो. याबाबत चिंता व्यक्त करताना डॉ. बडवे यांनी स्तन कर्करोग वाढण्यामागील प्रमुख कारणांवर चर्चा केली.
(हेही वाचा पाकिस्तानचा खोडसाळपणा; हिंदूंना हिंसक दाखवून बदनाम करणारी वेब सिरीज; ट्रेलरनंतर संतापाची लाट)
स्तन कर्करोग वाढण्यामागील प्रमुख कारणे
- स्थूलता
- बाळाला स्तनपान न करणे
तज्ज्ञांच्या मते
- वांद्रे येथील लिलावती रुग्णालयाचे लॅप्रोस्कॉपिक आणि बॅरिएट्रीक सर्जन डॉ. सशांक शाह यांनी स्थूलता या आजारावर तातडीने उपचार करण्याचा सल्ला दिला. वजन अनियंत्रित झाल्याची जाणीव होताच रुग्णाने तातडीने फॅमिली फिजिशीयनचा सल्ला घ्यावा. आता स्थूलता नियंत्रणात आणण्यासाठी बाजारात औषधेही उपलब्ध झाली आहेत. स्थूलता नियंत्रणात आणण्यासाठी बॅरिएट्रीक सर्जरीला ही औषधे पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. स्थूलता वेळेवर नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. अन्यथा पेशींची वाढ झपाट्याने झाल्यास स्तन कर्करोग व इतर कर्करोगही होण्याची भीती आहे.
- गिरगाव येथील रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनीही महिलांनी स्तनपान करण्याकडे दुर्लक्ष करायला नको, असा सल्ला दिला. अनेक संशोधनात, स्तनपान केल्याने महिलांना स्तन कर्करोग होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. सहा महिने ते मूल वर्षाचे होईपर्यंत महिला आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकतात. महिलांनी आपल्या बाळाला किमान सहा महिने स्तनपान द्यावे, असेही त्या म्हणाल्या.