शाईफेक प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत वाढ

138

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील जिथे जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांबरोबर क्राईम ब्रांचचे पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात येत आहेत. राज्य पोलिसांच्या सुरक्षेबरोबरच चंद्रकांत पाटील यांना CISF या केंद्रीय सुरक्षा दलाचीदेखील सुरक्षा आहे. त्यामध्ये देखील वाढ करण्याचा विचार सुरु आहे. चंद्रकांत पाटील सोमवारी पुण्यातील कर्वेनगर भागातील एका संस्थेला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी वारजे पोलीस स्टेशनचे पन्नास पोलीस, क्राईम ब्रांचचे पाच अधिकारी, वाहतूक पोलिसांचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

चिंचवड येथे चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी सायंकाळी चिंचवड इथे शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील हे चिंचवड गाव इथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. डाॅक्टर बाबसाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला.

पोलीस कर्मचा-यांचे निलंबन

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस कर्मचा-यांवर कारवाई केली. अंकुश शिंदे यांनी आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी अशा एकूण 11 जणांना निलंबित केले आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शाई फेकली होती.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.