मोदींमुळे भाजप जिंकतो की भाजपमुळे मोदी जिंकतात?

179

२०१४ ला मोदी जिंकले तेव्हा म्हटलं गेलं की ही ’मोदी लाट’ आहे. २०१९ ला मोदी लाट ओसरली असं म्हणता म्हणता मोदी पुन्हा एकदा बहुमताने पंतप्रधान झाले. भाजपचे अनेक समर्थक भाजपवर नाराज असतात कारण त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी चांगलं काम करतात पण इतर नेते कामे करताना किंवा निवडणूक जिंकण्यासाठी खटपट करताना दिसत नाहीत. मोदी नसतील तर भाजपचं काय होईल असा प्रश्न देखील अनेकांना पडतो.

संघ हा खूपच धीम्या गतीने काम करतो आणि भाजपला जे ग्लॅमर प्राप्त झालं आहे ते नरेंद्र मोदीमुळे असे आरोप होत राहतात. आता निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आरोप करणार्‍यांना उत्तर मिळालं आहे. संघाची काम करण्याची आपली एक पद्धत आहे आणि त्यात काळानुसार परिवर्तनदेखील होत आहे. संघाची गती कमी आहे असं म्हणत असताना संघाची पकड मजबूत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.

नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय उदय झाल्यानंतर भाजपला ग्लॅमर प्राप्त झालं हे खरं आहे. परंतु मोदी हे संघाचे स्वयंसेवक, प्रचारक होते आणि भाजपचे एक कार्यकर्ते होते हे विसरुन चालणार नाही. नरेंद्र मोदी हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे यात वाद नाहीच. परंतु या अद्वितीय व्यक्तिमत्वावर संघाचे संस्कार झाले आहेत, हे ज्ञात असायला हवे. मोदींमुळे भाजप जिंकला की भाजपमुळे मोदी जिंकले हा प्रश्न चुकीचा आहे.

महात्मा गांधींबद्दल त्यांचे अनुयायी म्हणतात ’दे दी हमे आझादी, बिना खडग्‌ बिना ढाल, ऐ साबरमती के संत तुने कर दिया कमाल.’ त्यांना सगळं श्रेय फक्त गांधींनाच द्यायचंय. गांधी स्वातंत्र्य चळवळीत होते, त्यांचं योगदानही महत्वाचं आहे. परंतु केवळ त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं असं म्हणणं म्हणजे इतर क्रांतिकारकांवर अन्याय ठरेल. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींनी भाजपला जिंकायची सवय लावली हे खरं असलं तरी, त्यांच्या आधीच्या पिढीचं योगदान विसरता येत नाही. ज्याकाळी पुष्ट वातावरण नव्हतं, तेव्हा वाजपेयी, अडवाणी प्रभृती लोकांनी किल्ला लढवला. त्यांना यश प्राप्त झालं नसलं तरी लढण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली त्याचबरोबर कॉंग्रेस नावाचा डोंगर पाडण्यासाठी त्यांनी जे प्रहार केले, त्यामुळे मोदींना पुष्ट वातावरण मिळाले, हेही तितकेच महत्वाचे!

( हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; पण जेलमध्येच राहणार, कारण काय? )

नरेंद्र मोदींविषयी लिहिताना मी बर्‍याचदा वाजपेयी किंवा अडवाणींचे उदाहरण देत नाही तर मी स्वा. सावरकरांचे उदाहरण देतो. सावरकरांनी जे बीज पेरलं, त्याचं आता बलाढ्य वृक्षात रुपांतर झालं आहे आणि त्या वृक्षाचं एक गोड फळ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी. मोदींच्या विजयामध्ये सावरकरांच्या प्रचारकी चळवळींचा खूप मोठा हात आहे. इतक्या वर्षांत एक नेता हिंदुंना हवा होता. वाजपेयी, अडवाणी आले. त्यांनी त्यांचं काम केलं. पण नंतर मात्र प्रभावी असं नेतृत्व मिळू शकलं नाही. ते नेतृत्व कृष्णाच्या नगरीत घडत होतं आणि इतक्या वर्षांच्या अंतराने मोदींसारखा नेता मिळाला.

आता मोदी काही वर्षांनी निवृत्त होतील. कदाचित २०२६-२७ मध्ये ते निवृत्ती स्वीकारतील. मग मोदींनंतर कोण असा प्रश्न अनेकांना सतावत असेल तो प्रश्न मोदींनी केव्हाच सोडवला असणार, केवळ त्याचं उत्तर वेळ आल्यावरच ते देणार आहेत. आता ज्या निवडणुका झाल्या, गुजरात, दिल्ली, हिमाचल; या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी खूप प्रचार केला नाही. पूर्वी मोदी ज्याप्रमाणे प्रचारात उतरायचे त्याप्रमाणे ते प्रचारात उतरले नाहीत. तरीदेखील हिमाचलचा पराभव असो, दिल्लीतील कांटे की टक्कर असो किंवा सर्व विरोधकांच्या छातीत धडधडेल अशा प्रकारचा गुजरातचा भव्य दिव्य विजय असो; या सर्व गोष्टी स्थानिक नेत्यांमुळे शक्य झाल्या आहेत. नरेंद्र मोदी हिटलर आहेत असा खोटा आरोप होत असताना, मोदींनी प्रत्येक राज्यात नेतृत्व निर्माण केलं आहे. महाराष्ट्रात फडणवीस व इतर नेते आहेत. उत्तर प्रदेशात योगी आहेत, गुजरातमध्ये सी. आर. पाटील आहेत असे अनेक नेते तयार झाले आहेत जे मोदींच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत.

त्यामुळे मोदी लाट वगैरे असले शब्द उच्चारण्याऐवजी ही भगवी लाट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यापुढे विरोधकांना केवळ मोदींशी लढायचं नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांशी लढायचं आहे आणि ही लढाई त्यांना वाटते तितकी सोपी नसणार. एक मोदी ज्यांना सांभाळता आला नाही, असे अनेक मोदी निर्माण झाले तर काय होईल? संघ, भाजप, मोदी हे एक वेगळं समीकरण आहे. कोणाच्या असण्यामुळे कोणाचं अस्तित्व आहे ही चर्चा मूर्ख लोक करतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे एक चक्र आहे, जे चालतच राहणार आहे. याचं उत्तर वेगळ्या शब्दात द्यायचं झालं तर मी म्हणेन, ब्रह्म, विष्णू, महेश ह्यांच्यात मोठं कोण हे ठरवता येत नाही. प्रत्येक तत्व आपापलं काम योग्यपणे करत असतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. थोडक्यात, ही भगवी लाट आहे, हे भगवं वादळ आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.