मुंबईतील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी देशभरातील ७५ तज्ज्ञ मंडळींचे विचारमंथन

198
मुंबईत हरितक्षेत्राची अधिकाधिक चांगली जपणूक व्हावी आणि वाढ व्हावी तसेच मुंबईचे पर्यावरण सातत्याने समृद्ध व्हावे, या उद्देशाने मुंबईत दोन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या १४ व १५ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या या कार्यशाळेत देशभरातील ७५ तज्ज्ञ सहभागी होणार असून हरित क्षेत्र जपणूक व संवर्धन या विषयावर सविस्तर विचारमंथन करून भविष्यातील अंमलबजावणीची दिशा ठरवली जाणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
भायखळा परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित होणाऱ्या या  कार्यशाळेबाबत माहिती देताना जितेंद्र परदेशी यांनी सांगितले की, “मुंबईत हरित क्षेत्र वाढवणे, जैवविविधता जपणे आणि पर्यायाने पर्यावरण अधिकाधिक समृद्ध करणे यासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने काम करत असते. याच कार्यवाहीचा भाग म्हणून वृक्ष जपणूक आणि वृक्षारोपण यासह मुंबईतील विविध ठिकाणी उभी उद्याने अर्थात ‘व्हर्टिकल गार्डन’, उड्डाणपुलांखालील जागांचा पर्यावरण पूरक वापर आणि मियावाकी वने यासारख्या विविध उपायोजना नियमितपणे राबविल्या जात आहेत. परंतु, तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या मुंबईसारख्या शहरात जागेची असणारी कमतरता लक्षात घेऊन उपलब्ध जागेचा अधिकाधिक पर्यावरण सुसंगत विकास करण्यासाठी एक अभ्यासपूर्ण कृती आराखडा बनवण्याची गरज आहे. यासाठी हरितक्षेत्र – पर्यावरण, वनस्पती – वृक्ष आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत सविस्तर विचारमंथन होणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.”
मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभागाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेमध्ये टाटा समाज विज्ञान संस्था (TISS), वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया (WRI), युथ फॉर युनिटी अँड वॉलिंटरी एक्शन यांचाही सहभाग असणार आहे. या कार्यशाळेत हरितक्षेत्र व्यवस्थापन व संवर्धन समुदाय आधारित कार्यक्रम अंमलबजावणी, विविध स्तरीय उपाययोजनांसाठी आंतरविद्याशाखीय सहभाग, दीर्घकालीन परिरक्षणासाठी पर्यावरणाच्या अनुषंगाने उपजीविका विषयक बाबींविषयी उहापोह इत्यादी विविध विषयांवर सविस्तर चर्चा आणि विचारमंथन होणार आहे, असेही परदेशी यांनी कळविले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.