मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी दत्ता यांना न्यायमूर्तीपदाची शपथ दिली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या शपथविधीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 28 झाली आहे. सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एकूण मंजूर संख्या 34 आहे.
(हेही वाचा – पुन्हा होणार नोटबंदी! भाजप खासदाराने का केली २ हजारांची नोट बंद करण्याची मागणी?)
केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या न्याय विभागाने रविवारी एक अधिसूचना जारी करुन त्यांची नियुक्ती जाहीर केली होती. न्यायमूर्ती दत्ता यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1965 रोजी झाला. या वर्षी ते 57 वर्षांचे झाले असून सर्वोच्च न्यायालयात त्यांचा कार्यकाळ 8 फेब्रुवारी 2030 पर्यंत राहील. सर्वोच्च न्यायालयात निवृत्तीचे वय 65 वर्षे आहे. गेल्या 26 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती यूयू ललीत यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दत्ता यांच्या नावाची शिफारस केली होती. सुमारे अडीच महिन्यांनंतर सरकारने या शिफारसीवर शिक्कामोर्तब करुन अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले. त्यास मंजूरी देताना राष्ट्रपतींनी नियुक्तीचे पत्र जारी केले. सध्या, सर्वोच्च न्यायालयात एकूण 34 न्यायाधीशांच्या निश्चित संख्याबळाच्या तुलनेत केवळ 27 न्यायाधीश कार्यरत आहेत.
न्यायमूर्ती दत्ता यांची 22 जून 2006 रोजी कोलकता उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. यानंतर, 28 एप्रिल 2020 रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले. कोलकाता उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, त्यांनी 1989 मध्ये कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर 16 नोव्हेंबर 1989 रोजी त्यांची वकील म्हणून नोंदणी झाली होती.
Join Our WhatsApp Community