आसाममधील भाजप खासदार पबित्रा मार्गेरिटा यांनी चहाला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करण्याची विनंती सरकारला केली आहे. चहा हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि देशातील अनेक लोक दररोज फ्रेश होण्यासाठी चहा आवर्जून घेतात. भारतातील अनेक भागांमध्ये पाहुणचाराचा भाग म्हणून पाहुण्यांना चहा देण्याची प्रथा देखील आहे.
खरंतर चहा हा परदेशातून इंग्रज घेऊन आले. मात्र आता चहा हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. पबित्रा मार्गेरिटा म्हणाले की, देशात शेकडो चहाच्या बागा असून त्यामध्ये 50 लाखांहून अधिक लोक काम करतात. ब्रिटीश राजवटीत आणि गेल्या 70 वर्षात चहाच्या बागेत काम करणाऱ्या मजुरांची पिळवणूक झाली. चहा उद्योगाला 200 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारने विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर करावे.
(हेही वाचा – तुम्ही चहाचे शौकिन आहात? तर चहासोबत चुकूनही खाऊ नका या गोष्टी)
पुढील वर्षी 2023 मध्ये आसामच्या प्रसिद्ध चहाला 200 वर्षे पूर्ण होत आहेत. आसाम सरकार आणि आसामी लोक मोठ्या थाटात हा उत्सव साजरा करण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे चहा हा देशाच्या संस्कृतीचा एक भाग असल्याने तो कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंत आणि गुजरातपासून ईशान्येपर्यंत प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो, त्यामुळे चहाला राष्ट्रीय पेय घोषित केले पाहिजे. यासाठी केंद्र सरकारनेही सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. चहाबाबत होत असलेल्या काही गैरप्रकारांकडे त्यांनी लक्ष वेधले आणि म्हणाले की, चहाच्या नावाखाली अनेक प्रकारची पेये बाजारात आली आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे.