मुंबई महापालिकेच्यावतीने सुशोभिकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून शहर आणि उपनगरांमधील ५०० प्रकल्पांच्या प्रसिध्दीमध्ये महापालिका प्रशासन कमी पडल्याने चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या ५०० प्रकल्प कामांच्या भूमीपूजनाच्या प्रसिध्दीकरता वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिरात प्रकाशित न झाल्याने महापालिकेच्या एका सहआयुक्ताला चक्क सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. एवढेच नाही या प्रकल्पाच्या प्रसिध्दीची जबाबदारी सांभाळणाऱ्या जनसंपर्क विभाग आणि राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी सहायक आयुक्त(मालमत्ता)यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची खरडपट्टी काढल्यानंतर त्यांनी सहआयुक्तांना रजेवर पाठवत जनसंपर्क विभाग व राजशिष्टाचार विभागाचा पदभार सामान्य प्रशासनाकडून काढून मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्तांकडे सोपवत ही नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली कारवाई
शहर भागातील सर्व ९ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील सुशोभिकरणाच्या कामांचा शुभारंभ मागील सोमवारी, ७ डिसेंबर २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री दिपक केसरकर आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थित करण्यात आले. या ५०० सौंदर्यीकरणाच्या भूमीपूजन तथा शुभारंभाच्या कार्यक्रमाची जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली असली तरी ती वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिध्द न झाल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांसह संबंधित अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या प्रकल्प कामांची योग्यप्रकारे प्रसिध्द न झाल्याने तसेच गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थितांचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर तातडीने मग आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार तात्काळ ए विभाग कार्यालय आणि महापालिका मुख्यालय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार महापालिकेचे कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. परंतु यामुळे कार्यक्रमाची गर्दी वाढली असली तरी मुख्यमंत्र्यांची नाराजीने आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांचा पारा वाढल्याने त्यांनी लागलीच संबंधित जनसंपर्क विभाग आणि राजशिष्टाचार विभागाला फैलावर घेतले. परंतु जनसंपर्क विभाग हे सामान्य प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांच्या अधिपत्याखाली असल्याने तेच याला जबाबदार असल्याची माहिती समोर आल्याने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी संबंधित सहआयुक्तांना सक्तीच्या रजेवर जाण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सहआयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर यापुढे जनसंपर्क विभागासह राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी सहायक आयुक्त (मालमत्ता) यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा India China Faceoff: अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक)
Join Our WhatsApp Community