राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. इतकेच नाही तर मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जिवे ठार करू अशी धमकी या फोनवरून देण्यात आली. शरद पवार यांचा नुकताच काल, सोमवारी १२ डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना आलेल्या या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे.
शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकीचा फोन हा बिहारमधून आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने ही धमकी हिंदीतून दिली असून पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांत अज्ञाताविरोधात भादंवि कलम 294, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकीच्या फोननंतर आता मुंबई पोलिसांकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा पवारांच्या सुरक्षितता वाढविण्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Agnipath Scheme: ‘…त्यांनी सैन्यात भरती होऊ नये’; उच्च न्यायालयानं दिला महत्वपूर्ण निकाल)
दरम्यान, शरद पवारांना धमकीचा फोन कॉल बिहारमधून आला होता. यापूर्वीही त्याच व्यक्तीने पवारांना धमकी दिली होती. त्यावेळी मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती आणि समजूत घालून सोडून दिले होते. परंतु आता पुन्हा एकदा त्याच व्यक्तीने धमकी दिली असून मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसून तो व्यक्ती मनोरूग्ण आहे. त्यामुळे या व्यक्तीने असे प्रकार याआधीही केले असल्याचे सांगितले जात आहे.