‘तुमची उंची किती, बोलता किती? बाईने बाईसारखं…’, सुषमा अंधारेंवर ‘मनसे’चा हल्लाबोल

104

शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे आणि मनसे नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखीच विकोपाला जाताना दिसताय. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी तर एका मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारेंच्या बाईपणावर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले, तुमची उंची किती, तुम्ही बोलता किती, बाईने बाईसारखे बोलावे, माणसासारखे बोलू नये…. तुमचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आहे, हे सर्वांना माहिती आहे, असे म्हणत बाळा नांदगावकर यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे. मुंबईतील कोकणवासियांसाठी मनसेतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यात ते बोलत होते.

(हेही वाचा – ‘CNG’ वरील गाड्या खरेदीचा निर्णय ‘MSRTC’ कडून रद्द; डिझेल गाड्याच घेणार!)

काय म्हणाले बाळा नांदगावकर

सुषमा अंधारे यांनी आपले अंथरूण पाहूनच पाय पसरावेत, कहाँ राजा भोज आणि कहाँ गंगू तेली… असा टोमणाही सुषमा अंधारे यांना बाळा नांदगावकर यांनी लगावला आहे. बाईमाणसाने बाईसारखेच बोलले पाहिजे, माणसासारखे बोलू नये. आम्हीही माझगावचे आहोत. माझगावचे त्यांचे पूर्वीचे नेते यांच्याकडून कशी एक्टिंग करायची हे आम्ही शिकलो आहे. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त ॲक्टिंग करू शकतो. त्यामुळे कोणावर टीका करायची याचा विचार केला पाहिजे. आम्ही कधी त्यांच्या वरिष्ठांवर टीका केली नाही. आम्हाला भान आहे, कोणावर टीका करावी, कोणावर करू नये, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांचे खंडनही केले. आपल्या साहेबांवर नेहमी आरोप करतात की साहेब भूमिका बदलतात. मात्र राज ठाकरे दिशा बदलवून इतिहास बदलतात. जे कधीही घडत नव्हतं ते राज ठाकरेंनी बदललं. किती दिवस आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, आता सत्तेतपण असलो पाहिजेत. आमदार, खासदार आपले असावेत, त्यासाठी कामाला लागलं पाहिजे.

या कार्यक्रमात मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाईदेखील उपस्थित होते. संदीप देशपांडे म्हणाले, मी ज्या गावात राहतो, त्याठिकाणी आपला सरपंच असला पाहिजे, असा संकल्प करायला हवा. एकदा सरपंच पदी मनसेचा कार्यकर्ता बसला तर आमदारकी सोपी जाईल. राजकीय वातावरण ज्या पद्धतीने बदलतंय, त्याचा फायदा आपणही घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती. सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेत राज ठाकरे यांच्यावर आरोप केला होता. त्या म्हणाल्या की, आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. त्याचा उठ दुपारी आणि घे सुपारी… असाच कार्यक्रम असतो. ते अचानक गुहेतून बाहेर येतात. अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात. या विधानावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.