हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचेच; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

99
नागपुरात होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन आठवड्यांचा असेल, यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. १९ ते ३० डिसेंबरपर्यंत विधिमंडळाचे कामकाज चालणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी विधान भवनात झाली. बैठकीत विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर येथील पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्ष, तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मान्य केले. २९ डिसेंबरला ही बैठक होणार असून, आवश्यकता असल्यास कामकाज एका आठवड्याने वाढवण्यासंदर्भात निर्णय त्यात घेतला जाणार आहे.

कामकाज सकाळी ९.३० पासून सुरू करा!

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरे व्हावे, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली आहे. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे. मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा. विधिमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून  सुरू व्हावे, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.