विविध देशांना व्यापारी मार्गाने जोडणारी वन बेल्ट वन रोड ही योजना हाती घेणा-या चीनची जगावर प्रभाव गाजवण्याची महत्त्वाकांक्षा वारंवार दिसून आली आहे. परंतु, आता चीनचा कोणत्या देशात किती प्रभाव आहे हेही समोर आले आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये चीनचा प्रभाव मोजण्यासाठी 82 देशांच्या चायना इंडेक्समध्ये पाकिस्तान अव्वल आहे.
तैवानची संशोधन संस्था डबल थिंक्स लॅब्सने 82 देशांवरील चीनच्या प्रभावाचा डेटाबेस तयार केला आहे. हा चायना इंडेक्स 2022 आहे. या इंडेक्सनुसार, सर्वाधिक चिनी प्रभाव असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान अव्वल आहे. या अभ्यासानुसार, पाकिस्तानवर चीनचे सर्वाधिक नियंत्रण आहे. युरोपीय देश जर्मनी 19 व्या तर अमेरिका 21 व्या क्रमांकावर आहे.
चीन निर्देशांकाच्या क्रमवारीत अव्वल देश
- पाकिस्तान
- कंबोडिया
- सिंगापूर
- दक्षिण आफ्रिका
- पेरु
- फिलिपिन्स
- किर्गिझस्तान
- ताजिकिस्तान
- मलेशिया
पाकिस्तानचे संपूर्ण तंत्रज्ञान चीनवर अवलंबून, जाणून घ्या टक्केवारी
- तंत्रज्ञान- 97.7 टक्के
- परराष्ट्र धोरण- 81.8 टक्के
- शिक्षण-62.5 टक्के
- मिलिट्री शिक्षण- 80 टक्के
- अर्थव्यवस्था-54.5 टक्के
- मीडिया- 52.3 टक्के
- अंतर्गत राजकारण-52.8 टक्के
पाकिस्तानमध्ये चीनचे ऊर्जा प्रकल्प आहेत. तसेच, शिपिंग क्षेत्रात चीनच्या गुंतवणुकीमुळे ग्वादर ते काशगरपर्यंत वाहतुकीचे जाळे तयार केले जात आहे. याचा फायदा शिपिंग उद्योगाला होणार आहे. या नेटवर्कद्वारे शिपिंग वेळ 45 दिवसांपासून फक्त 10 दिवसांवर येईल.
( हेही वाचा: चीनने ‘अशी’ साधली घुसखोरीची संधी; जाणून घ्या तवांगमधील संघर्षाबाबत सविस्तर )
चीनची पाकिस्तानमधील गुंतवणूक भारतासाठी धोकादायक
उद्योगांच्या उत्पादनांची निर्यात करण्यासाठी चीनला पश्चिम सीमेवरही मार्ग खुला करणे आवश्यक आहे. यासाठी चीनने स्वत:साठी इराण आणि तुर्कस्तानमधून कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तानमध्ये युरोपपर्यंतचा आधुनिक सिल्क रुट तयार केला आहे. यासोबतच चीन पाकिस्तान इकाॅनाॅमिक काॅरिडोअरही बांधला जात आहे. चीनचे पाकिस्तानमध्ये स्वारस्य असण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे भारतावर नियंत्रण आहे. चीनला भारताशी थेट संघर्ष नको आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानमध्ये गुंतवणूक वाढवत आहे. याशिवाय चीनला पाकिस्तानच्या माध्यमातून आखाती देशांमध्ये पोहोचायचे आहे. आखाती देशांतून तेल आयातीसाठी चीनला हिंदी महासागराचा पर्याय बनवायचा आहे. या कारणास्तव चीनने बेल्ट अॅंड रोड इनिशिएटिव्हचा भाग म्हणून पर्यायी मार्ग विकसित केला आहे.
Join Our WhatsApp Community