तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी बाॅलिवूडचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी करत त्यांना पुढील सुनावणीला न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्याच्या पार्श्वभूमीवर तालिबान आणि संघाची तुलना केली होती. यावर स्वत: ला संघ समर्थक असल्याचा दावा करत वकील संतोष दुबे म्हणाले की, अख्तर यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी संघाचे नाव अनावश्यकपणे वादात ओढले.
6 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
जावेद अख्तर यांनी राजकीय हेतूने आरएसएसच्या नावाचा अनावश्यकपणे वापर केल्याचेही दुबे यांनी म्हटले आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने जावेद अख्तर यांना मंगळवारी समन्स बजावत 6 जानेवारी रोजी मुलुंड न्यायालयात होणा-या पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
( हेही वाचा: अरबी समुद्रात वादळाचे संकेत, किनारपट्टीला धोका? )
संघाची तालिबानशी तुलना
ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानमधील सत्तांतरानंतर जगभरात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातच जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीवर यासंदर्भात मत व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची थेट तालिबानशी तुलना केली होती. संघाची विचारसरणी ही तालिबानींसारखी आहे. आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचे अख्तर म्हणाले होते. यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत वकील संतोष दुबे यांनी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात जावेद अख्तर यांच्याविरोधात आयपीसी कलम 499 ( मानहानी) 500 ( बदनामी) अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल केली होती.
Join Our WhatsApp Community