महापालिका कर्मचाऱ्यांचा असाही विक्रम…

176

स्वर्गीय हसरत जयपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत, सो-गो अर्थात शैलेंद्र सोनटक्के आणि उत्तम गोवेकर यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी, अभियंता, डॉक्टर्स, नर्सेस, शिक्षक, शिक्षिका, इतर कर्मचारी आणि कामगार यांनी सलग दहा तास हसरत जयपुरी यांनी लिहिलेली तब्बल ११८  द्वंद्वगीते गाऊन जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मिळून हा अनोखा जागतिक विक्रम रचला असून एकाच गीतकाराची सर्व गाणी गाऊन केलेला हा पहिला विक्रम ठरला आहे.

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सो गो कुटुंबातर्फे शनिवार १० डिसेंबर २०२२ किंग ऑफ रोमान्स हसरत जयपुरी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त माटुंगा कल्चरल सेंटर येथे आयोजित ‘तुम तो प्यार हो’ या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेली ११८ युगल गीते ही ६३ पुरुष गायक व ६३ महिला गायकांनी सकाळी पावणे अकरा ते रात्री साडे अकरा या कालावधीत कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता सलगपणे ही सर्व गाणी गाऊन एका नवीन विश्व विक्रमाची नोंद केली आहे. हे सर्व महापालिका कर्मचारी असून कार्यालयीन सेवा बजावून इतर वेळामध्ये सराव करत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

( हेही वाचा: अरबी समुद्रात वादळाचे संकेत, किनारपट्टीला धोका? )

या विश्वविक्रमी कार्यक्रमाला  हसरत जयपुरी यांचे मोठे चिरंजीव अख्तर जयपुरी व  स्नुषा अझरा जयपुरी व त्यांचा छोटा मुलगा असिफ जयपुरी, त्यांचे  मित्र चंदू बारदानवला हे उपस्थित होते. तसेच इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रतिनिधी डॉ. जय पटाडिया हे सपत्नीक  उपस्थित होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घातली असली तरी मुंबई महापालिका प्रशासनाकडून याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. एका बाजुला महापालिका आयुक्त व प्रशासक हे कोविड काळातील महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांच्या बळावर डॉक्टरेटसह जागतिक पातळीवर आपली वाह व्वा करून घेत पुरस्कार तसेच सन्मान मिळवत असताना, दुसरीकडे आपल्या कामासोबत गायनाची कला जोपासत सलग एकाच गीतकाराची ११८ गाणी गाऊन केलेल्या विक्रमाबाबत आपल्या दालनात बोलावून त्यांचा प्रातिनिधीक सत्कारही करावासा वाटला नाही. त्यामुळे या सर्व गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने  गायक चमुंचा सत्कार करायला आणि राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडेही यासाठी  शिफारस करायला हवी भावना सर्व कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.