रुग्ण संख्या घटली, ‘हे’ कोविड स्पेशालिस्ट रुग्णालयही होणार बंद?

135

कोविड काळात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या आणि  कोविड स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंधेरी पश्चिम येथील मरोळमधील सेव्हन हिल्स रुग्णालय आता बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. सध्या कोविडच्या रुग्णांची संख्या घटल्याने सर्व जंबो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेल्या या एकमेव रुग्णालयांमध्येही कोविड रुग्णांची संख्या  शुन्यावर आल्याने आता हे रुग्णालय सुरु ठेवणे योग्य नसल्याने ते बंद करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत असल्याची माहिती मिळत आहे.

वादात सापडले होते रुग्णालय

मरोळ येथील महापालिका रुग्णालयाच्या इमारतीसह भूभाग सेव्हन हिल्स हॉस्पिटल लिमिटेड व सोमा इंटरनॅशनल या संयुक्त भागीदारीतील कंपनीला २००४मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर २० जानेवारी २००५मध्ये जागेचा करार करण्यात आला आणि त्यानंतर १३ डिसेंबर २०१३मध्ये महापालिकेसोबत केलेला सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार सेव्हन हिल्स रुग्णालय सुरु होते. परंतु सांमजस्य करारातील अटींचा भंग केल्याने तसेच नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने, या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला महापालिकेने २४ जानेवारी २०१८ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर तत्कालिन अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी न्यायालयात योग्यप्रकारे बाजु मांडून रुग्णालयाची जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे मार्च २०२०मध्ये जेव्हा कोविडचे जागतिक संकट आले त्यात कोविडच्या रुग्णांना क्वारंटाईन करणे व वैद्यकीय उपचार करण्यासाठी सेव्हन  हिल्स रुग्णालया सुविधा उपलब्ध करून दिली.

(हेही वाचा वीर सावरकरांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेतून निधी; राज्य शासनाची मान्यता)

५० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले

तेव्हापासून सेव्हन हिल्स हे कोविडचे स्पेशालिस्ट रुग्णालय म्हणून ओळखले जावू लागले आहे. सेव्हन  हिल्समध्ये आतापर्यंत सुमारे ५० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यातील सुमारे ३२०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले. याच रुग्णालयांमध्ये कोविडच्या रुग्णांवर करण्यात येणाऱ्या कॉकटेल फॉर्म्युल्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता.  महापालिकेच्या १७०० खाटा आणि रिलायन्स रुग्णालयाच्या १५० खाटा अशाप्रकारे १५२२ खाटा आणि ३२८ आयसीयू खाटांचे हे रुग्णालयात कोविडच्या रुग्णांची संख्या घटल्याने हे रुग्णालय बंद करण्याचा विचारात महापालिका प्रशासन असल्याची माहिती मिळत आहे.याबाबत अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशाप्रकारचा कोणत्याही प्रकारचा निर्णय महापालिकेने घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रिलायन्सने काढून घेतली सेवा?

कोविडच्या काळात या रुग्णालयात एच.एल. रिलायन्स रुग्णालयाने  आयसीयू सह १५० खाटांची सेवा सुविधा दिली होती. ही सेवा सुविधा रिलायन्स रुग्णालयाच्या माध्यमातून आजतागायत सुरु आहे. परंतु आता ही सेवा बंद करण्याबाबत रिलायन्सनेही महापालिकेला सुचित केले असून यापुढे ही सेवा देता येणार नाही,त्यामुळे कार्यमुक्त करण्यात यावे अशाप्रकारचे पत्रही त्यांनी पाठवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या पत्रानंतरच सेव्हन हिल्स रुग्णालय बंद करण्याचा विचार प्रशासनाने केला असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.