मंगळवारी मुंबई आणि मीरारोडमधील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात 58 वर्षांच्या वृद्धांनी मरणोत्तर केलेल्या अवयवदानामुळे चार गरजू रुग्णांना नवे आयुष्य मिळाले. दोन्ही घटनांमध्ये मृत रुग्णांच्या कुटुंबियांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला.
मुलुंड येथील संजय पाटील (58) यांना बोलताना आणि चालताना त्रास होत होता. त्यांना विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात उपचारांसाठी कुटुंबीयांनी दाखल केले. डॉक्टरांनी संजय पाटील यांना पक्षाघाताचा झटका आल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. दुसऱ्या दिवशी संजय पाटील यांना परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. 9 तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र 12 तारखेला संजय पाटील यांना डॉक्टरांनी मेंदू मृत घोषित केले. अवयवदानाचे महत्व जाणून असल्याने आम्ही मूत्रपिंड दान केले, बाबांना समाजकार्याची आवड होती. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला अशी माहिती आशुतोष पाटील यांनी दिली. या घटनेशी साधर्म्य असलेली घटना त्याच दिवशी मीरारोड येथील वोकहार्ड रुग्णालयात घडली. मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांची दोन मूत्रपिंडे दान केली. मात्र रुग्णबाबत फारशी माहिती मिळू शकलेली नाही.