राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक

168

महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी, हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करुन त्याचे आदानप्रदान करण्यात आले.

‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीस हिंदुजा ग्रुपचे जी. पी. हिंदुजा, अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री  शिंदे यांनी हिंदुजा समूहाचे स्वागत करुन महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अत्यंत कमी कालावधीत हा सामंजस्य करार होत असल्याचे सांगून महाराष्ट्रातील भूमिपुत्र म्हणून हिंदुजा समूहाने या गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समूहाचे कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपूर्वी शासनाने ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली असून, त्यातून ५५ हजारांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. सरकारी विभागांमध्ये ७५ हजार नोकऱ्या आम्ही उपलब्ध करुन देत आहोत, मात्र खाजगी क्षेत्रातही आता या गुंतवणुकीमुळे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यांच्या जीवनात परिवर्तन येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नुकतेच नागपूर-मुंबई दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. हा फक्त महामार्ग नाही तर तो एक ‘गेमचेंजर प्रोजेक्ट’ असल्याचेही त्यांनी सांगितले.

( हेही वाचा: कळवा येथे तीन दिवसांचे ‘राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन !’ )

देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून उद्योगांच्या परवान्यांसाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. लवकरच यासंदर्भातील कायदा आणणार असून, उद्योगांना इतर प्रोत्साहनात्मक सुविधा सरकार देत आहे. महाराष्ट्रात गुंतवणुकीला पोषक वातावरण असून कुशल मनुष्यबळदेखील उपलब्ध आहे. उद्योजकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

हिंदुजा समूहाची ३५ हजार कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी हिंदुजा समूहाने राज्यात ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार गुरुवारी केला आहे. नवीकरणीय ऊर्जा, माध्यमे आणि मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाईल्स, बॅंकिंग- फायनान्स, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि नव तंत्रज्ञान या ११ क्षेत्रात हा उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे.

मी महाराष्ट्राचा, राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध – जी. पी. हिंदुजा

अतिशय कमी वेळेत हा सामंजस्य करार गुरुवारी होत असल्याबद्दल हिंदुजा समूहाचे जी. पी. हिंदुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. मी महाराष्ट्रातील असून १९१४ पासून इथे राहतो, राज्याच्या प्रगतीसाठी, समाजसेवेसाठी शिक्षण, आरोग्य, निर्मिती उद्योग, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात काम करून, अमेरिका, इंग्लंड येथील उद्योजक मित्रांना देखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी आणणार आहे.  अतिशय कमी वेळेत विविध निर्णय घेऊन सरकार गतीने काम करीत असल्याबद्दल हिंदुजा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले. गुरुवारी झालेल्या सामंजस्य करारांची गतीने अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.