देशभरातून मुंबईत लहान बालकांमध्ये गोवरचा उद्रेक सर्वात जास्त होत आहे. मुंबईत गोवरच्या बालकांची संख्या वाढत असताना न्यूमोनियाची लागण काही दिवसांतच होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईत गोवरच्या वेगळ्या विषाणूचा प्रवेश झाला आहे का, अशी शंका पालिका आरोग्य अधिका-यांनी व्यक्त केली आहे. मात्र वाढत्या गोवरच्या केसेसमध्ये मुंबईत गोवरचा विशिष्ट विषाणू नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. गोवरबाधित बालकांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्यात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली का, याबाबतीत सिरो सर्व्हेक्षणाची आवश्यकता असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे.
केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात गोवरचा उद्रेक झाल्यानंतर अखेरिस मुंबईत विलेपार्ले येथे युनिसेफ आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दोन दिवसीय प्रसारमाध्यमांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेला हजेरी लावलेल्या तज्ज्ञांनी मुंबईतील गोवरच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. मुंबईत सप्टेंबर महिन्यापासून गोवरच्या केसेस मोठ्या संख्येने आढळून आल्या. याबाबतीत अखेरिस नोव्हेंबर महिन्यात पालिका आरोग्य विभागाने मुंबईत लहान बालकांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याचे जाहीर केले. सप्टेंबर महिन्यानंतर आढळून येणा-या गोवरच्या रुग्णांना चार दिवसांतच न्यूमोनियाची लागण होत असल्याचे आढळून येत असल्याचे पालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉक्टर अरुणकुमार गायकवाड यांनी सांगितले.
( हेही वाचा: रेल्वे स्थानकांवर ट्रेन सुटण्याच्या १ तास आधी पोहोचा; प्रवाशांसाठी जारी केल्या विशेष सूचना )
गोवरबाधित बालकांना दोन आठवड्यानंतर कित्येकदा न्यूमोनियाची लागण झाल्याचे दिसून येते. मुंबईत मात्र चार दिवसांतच न्यूमोनियाची लागण होत असल्यास हा गोवरचा वेगळा विषाणू आहे का नाही, याबाबतीत सर्व्हेक्षणाची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेक्षण अधिकारी डॉक्टर मिता यांनी नव्या विषाणूच्या अंदाजाचे खंडन केले. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्यानंतर सिरो सर्व्हेक्षण करण्यात आले. रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली का, याबाबतीत माहिती घेण्यासाठी सिरो सर्व्हेक्षण आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रकारे गोवरच्या रुग्णांबाबतही सिरो सर्व्हेक्षण करायचा विचार सुरु असल्याचे डॉक्टर मिता म्हणाल्या. मात्र याबाबतीत अंतिम निर्णय घेणे बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community