राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार, संपूर्ण मुंबईसाठी ५ हजार स्वच्छतादूत नेमले जाणार असून त्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेत आमूलाग्र बदल दिसून येईल. यामध्ये हे स्वच्छतादूत कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत, तर महानगरपालिकेचे डोळे व कान स्वरुपात प्रत्यक्ष कार्यरत राहतील, असेही डॉ. चहल यांनी विशेषत्वाने नमूद केले आहे.
( हेही वाचा : जी- 20 देशांच्या प्रतिनिधींनी दिली कान्हेरी लेण्यांना भेट)
महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेला मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना, प्रधानमंत्री स्व-निधी योजना, माझी मुंबई – स्वच्छ मुंबई मोहीम आदींचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्यासमवेत सर्व सह आयुक्त, परिमंडळांचे उप आयुक्त, संबंधित खात्यांचे सह आयुक्त तथा उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित खाते प्रमुख यांची शुक्रवारी १६ डिसेंबर २०२२ रोजी ऑनलाईन कॉन्फरन्सीद्वारे आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई महानगरात होणाऱ्या दैनंदिन स्वच्छता कामांमध्ये आमूलाग्र सुधारणा होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार ५ हजार स्वच्छतादूत नेमायचे आहेत. तसेच प्रत्येक १० स्वच्छतादूतांमागे १ पर्यवेक्षक नेमायचा आहे. हे स्वच्छतादूत क्लीनअप मार्शलप्रमाणे दंडात्मक कारवाई करणारे नसतील, तर ते प्रामुख्याने महानगरातील त्यांना नेमून दिलेल्या भागात दैनंदिन स्वच्छता, कचरा संकलन इत्यादी बाबींवर देखरेख करतील तसेच जनजागृतीसाठी मदत करतील. स्वच्छतादूतांची कर्तव्ये, कामांच्या वेळा, मानधन इत्यादी अनुषंगाने धोरण तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे. विभाग कार्यालयांनी देखील आपल्या स्तरावर समन्वयासाठी संनियंत्रक नेमावा,अशाप्रकारचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Join Our WhatsApp Community