छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात महाविकास आघाडी शनिवारी मोर्चा काढणार आहे. या ‘विराट’ मोर्चाला काऊंटर करण्यासाठी भाजपानेही रणनीती आखली असून, शनिवारी दिवसभर शहर आणि उपनगरात ‘माफी मागो’ आंदोलन केले जाणार आहे.
( हेही वाचा : औरंगाबाद-शिंदखेडा एसटी बसचा अपघात; चालकासह १० प्रवासी जखमी)
हिंदू-देवदेवता आणि महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात, तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने युएनएससीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय संघाच्या विरोधात अकलेचे तारे तोडले आहेत त्याच्या निषेधार्थ शनिवारी संपूर्ण मुंबईमध्ये “माफी मांगो” आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील सहा विभागातील भाजपा खासदार, आमदार आणि पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपातर्फे देण्यात आली.
सुषमा अंधारे लक्ष्य
उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची वक्तव्ये सध्या समाजमाध्यमांवरून सर्वदूर होत आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान केल्याचे दिसत आहे. त्या विरोधात प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, यावरुन वाद निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न खासदार संजय राऊत यांच्याकडून सुरू आहेत. भारतातील संबंध आंबेडकरप्रेमींच्या मनात यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. या विरोधात मुंबई भाजपा सहा ठिकाणी माफी मागो आंदोलन करणार आहे, असेही भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.
या ठिकाणी होणार आंदोलन…
- उत्तर मुंबई – कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर, कांदिवली पूर्व (वेळ: सकाळी १०.३० वाजता)
- उत्तर पश्चिम – आगरकर चौक, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला, अंधेरी (वेळ: दुपारी ३:३० वाजता)
- उत्तर पूर्व – निलयोग मॉल, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व (वेळ: दुपारी १२ .३० वाजता)
- दक्षिण मध्य – कैलास मंदिर (लस्सी) समोर, दादर पूर्व (वेळ: सकाळी १०:३० वाजता)
- दक्षिण मुंबई – गांधी उद्यान, महाराष्ट्र भाजपा कार्यालयाच्या बाजूला, नरीमन पॉइंट (वेळ: सकाळी ११:३० वाजता)
- उत्तर मध्य – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुतळा, पश्चिम द्रुतगती मार्ग, विलेपार्ले पूर्व (वेळ: सकाळी ११: ३० वाजता)