मविआच्या महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी; काँग्रेसमध्ये वेगळीच चर्चा

189

महापुरुषांबद्दल भाजपा नेत्यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. मात्र, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या मोर्चाला दांडी मारल्याने त्याचीच चर्चा सर्वाधिक आहे.

भायखळ्यामधून या मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव गटासह महाविकास आघाडीमधील जवळपास सर्व नेते त्यात सहभागी झाले आहेत. परंतु, अशोक चव्हाण यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. आपण महामोर्चात का सहभागी होत नाही, याचे स्पष्टीकरण त्यांनी ट्विटरवर दिले आहे. ‘महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील सदस्याचा नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी’, असे ट्विट त्यांनी केले.

मात्र, निकटवर्तीयांच्या लग्नासाठी पत्नी अमिता चव्हाण यांना पाठवून अशोक चव्हाण स्वतः या मोर्चात सहभागी होऊ शकले असते, असा काँग्रेसमधील नेत्यांचा सुर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी फोनद्वारे चव्हाण यांच्याशी संपर्क साधून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. परंतु, त्यांनी साफ नकार दिला.

भाजपशी जवळीक?

  • अशोक चव्हाण यांची भाजपासोबत जवळीक वाढत असल्यामुळेच ते महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होणार नसल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
  • यापूर्वी देखील अशोक चव्हाण आणि भाजपच्या जवळकीच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. त्यातच आता ते महामोर्चाला उपस्थित राहणार नसल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.