महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारविरोधात शनिवारी महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्रद्रोंही विरोधात हल्लाबोल’ या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी शनिवारी रस्त्यावर उतरली होती. दरम्यान, या मोर्च्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्यपालांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही – शरद पवार
कोणत्याही राज्यात गेलो तरी तिथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा अपमान करणाऱ्या राज्यापालांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून केंद्र सरकारला सांगतोय या राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी करा, या सरकारमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे, ती महाराष्ट्राच्या बदनामीची, अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही – उद्धव ठाकरे
ब-याच वर्षानंतर देशाने एवढा मोठा मोर्चा पाहिला असेल. ज्यावेळी मोर्चाची घोषणा केली, मला विचारले गेले, तुम्ही चालणार का? मी एकटा नाही माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. हीच वेळ आहे. खुर्ची गेली तरी बेहत्तर पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, तडजोड करणार नाही, ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. राज्यापालांना मी मानत नाही, त्या पदावर कोणीही बसावे आणि महाराष्ट्राला टपल्या मारावे हे चालणार नाही. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले नसते तर आपण कुठे असलो असतो, ते त्यांच्या मंत्र्याने भीक हा शब्द वापरुन दाखवले आहे. हे वैचारिक दारिद्र्य आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
राज्यपालांना हटवले गेले पाहिजे- अजित पवार
चांद्यापासून ते बांद्यापर्यंत वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते आले आहेत. ही वेळ का आली, जे काही आता घडत आहे त्याला विरोध केला पाहिजे. शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. सावित्रीबाई फुले असतील की आंबेडकर असतील, त्यांच्याबद्दल बोलण्याचे कुभांड कोणी रचले आहे, त्याच्या मागचा मास्टरमाईंड कोण आहे? राज्यपाल झाले की, त्यांचे मंत्री बोलत आहेत. राज्यपालांना हटवले गेले पाहिजे. पुन्हा अस प्रकार होणार नाही हे पाहिले पाहिजे. अधिवेशनात त्यासाठी कायदा आणा आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी मागणी मी करत आहे, असे पवार म्हणाले.
सरकार उलथून टाकण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल- संजय राऊत
महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा अपमान आहे. राज्यातील साडेअकरा कोटी लोक हे सरकार कधी उलथवून टाकणार याची वाट पाहत आहे. हा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथवून टाकण्यासाठीचे पहिले पाऊल आहे. गावागावात या सरकारविरोधात आंदोलने सुरू आहेत. हे सरकार उलथवून लावण्याची लोक वाट पाहत आहेत, असे संजय राऊत यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.
Join Our WhatsApp Community