सुकेश चंद्रशेखर 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात मंडोली तुरूंगात आहे. सत्येंद्र जैन, महसूल मंत्री कैलाश गैहलोत आणि डीजी संदीप गोयल यांच्यावर सुकेश चंद्रशेखरने केलेले खंडणीचे आरोप चौकशी समितीच्या अहवालात बरोबर असल्याचे आढळले आहे. यामुळे आता दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : धक्कादायक! अकोल्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार; शीतपेयातून दिले गुंगीचे औषध)
लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी सुकेशच्या आरोपांबाबत प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन केली होती. या समितीने सुकेशची दोनदा भेट घेत अहवाल सादर केला. सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोत यांचा सुकेशसोबत संपर्क होता, फोन कॉल्स, चॅट, व्यवहारासाठी ठरवण्यात आलेली स्थाने या आधारे सुकेशच्या वक्तव्यात चौकशी समितीला तथ्य आढळले आहे. त्यामुळे लवकरच या अहवालाच्या आधारे लेफ्टनंट गव्हर्नर केंद्रीय एजन्सीकडे तपास सोपवू शकतात.
चौकशी समितीचा अहवाल…
- सुकेश चंद्रशेखरने सत्येंद्र जैन यांना ६० कोटी रुपये दिले. ( आपकडून राज्यसभेची जागा मिळवण्यासाठी ५० कोटी आणि सुरक्षा रक्कम म्हणून १० कोटी देण्यात आले)
- तत्कालीन महासंचालक संदीप गोयल यांना १२.५० कोटी दिले.
- दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांच्या दिल्लीतील असोला फार्म हाऊसवर सत्येंद्र जैन यांना ५० कोटी रोख ४ हप्त्यांमध्ये दिले.
- सुकेश चंद्रशेखरच्या चॅट्स, कॉल्सवरून हे स्पष्ट होते की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या आर्थिक व्यवहारांची पूर्ण माहिती होती. यासाठी तपास यंत्रणेला सुकेशचा फोन, चॅटची माहिती, लोकेशन, व्हिडिओ फुटेज देण्यात येणार आहे. असोला दिल्ली फार्म हाऊसवर सत्येंद्र जैन आणि कैलाश गेहलोत यांना पैसे दिल्यानंतर ते अरविंद केजरीवाल यांच्याशी फोनवरून बोलणे करून द्यायचे असा खुलासा सुकेशने तपास समितीसमोर केला आहे. अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्याचेही सुकेशने सांगितले आहे.
कोण आहे सुकेश चंद्रशेखर
मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशवर वेगवेगळ्या राज्यात जवळपास ३२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सीबीआय, ईडी आणि आयकर तपास सुरू आहेत. सुकेश चंद्रशेखरवर प्रभावशाली असल्याचे भासवून लोकांना फसवल्याचा आरोप आहे. मोठमोठ्या व्यक्तींसोबत फोटो दाखवून तो लोकांना फसवायचा आणि त्यांच्या कामासाठी सर्वाधिक पैसे घेत असे. त्याचप्रमाणे, त्याने दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून २१५ कोटी रुपये वसूल केले होते आणि त्याच्या ओळखीच्या आधारे आपण तिच्या पतीला जामीन मिळवून देऊ असे सांगितले होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुकेश तुरुंगातूनच फसवणुकीचे रॅकेट चालवत होता, अशीही माहिती समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community