मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षांकडून महापुरुषांबाबत होत असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शिवसेनेपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच समाजवादी पक्षच अधिक भाव खावून गेल्याचे पहायला मिळाले. मोर्चाच्या सभास्थानी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाचे भगवे ध्वज कुठेच दिसले नाही, उलट सर्वांत जास्त ध्वज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह समाजवादी पक्षाचे दिसून आले आहेत. त्यामुळे या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने या मोर्चासाठी पुढाकार घेतला असला तरी या मोर्चात शिवसेनेला या दोन्ही पक्षांनी मोठे होऊ दिले नाही, असे दिसून येत आहे.
( हेही वाचा : अर्थसंकल्पापूर्वी निर्मला सीतारमन यांनी घेतले महत्त्वाचे निर्णय! ४८ व्या जीएसटी कौन्सिल परिषदेत झाली चर्चा)
महाविकास आघाडीकडून आयोजित हल्लाबोल महामोर्चासाठी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून तयारी करण्यात आली होती. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण रस्त्यात तिन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आली. या मोर्चाचा समारोप टाईम्स ऑफ इंडियाजवळ करण्यात आला आणि याठिकाणी उपस्थितांना संबोधण्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या परिसरातील रस्त्यांच्या दुभाजकांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लावण्यात आले होते, तर बॅनरमध्ये समाजवादी पक्षाचे बॅनर सर्वाधिक होते. महापालिकेच्या मुख्यालयाशेजारी असलेल्या मोर्चाच्या समारोपाच्या ठिकाणी शिवसेनेला झेंडे लावायलाही या तिन्ही पक्षांनी जागा ठेवली नव्हती.
रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उध्दव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महामोर्चाचे बॅनर लावले असले तरी या बॅनरमध्ये सर्वाधिक बॅनर हे समाजवादी पक्षाने लावून हा मोर्चा कॅश करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे एरव्ही महापालिका मुख्यालयाशेजारी शिवसेनेने कोणताही कार्यक्रम केल्यास संपूर्ण परिसर भगवामय केला जातो, परंतु या मोर्चाचे आयोजन करताना आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेला आपले भगवे ध्वजही लावता आले नाही. रस्त्यांच्या मधोमध आणि दोन्ही बाजुला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्वज पहायला मिळत होते. त्यामुळे हा मोर्चा महाविकास आघाडीने काढला तर शिवसेना कुठे आहे असा प्रश्न पडत होता. त्यामुळे या मोर्चाचे सारे श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह समाजवादी पक्षाने घेऊन एकप्रकारे महाविकास आघाडीत सामील झालेल्या या नवीन भिडूला अभी तो तू बच्चा है असा संदेश तर या पक्षांनी मिळून दिला नाही ना? असा प्रश्न पडू लागला आहे.
Join Our WhatsApp Community