हल्लाबोल महामोर्चाला आघाडीच्या ‘या’ नेत्यांची पाठ

121

महाविकास आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल महामोर्चाला सुरुवात झाली तरी चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर हे चेंबूर येथील हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्यात व्यस्त होते. मोर्चाला न जाता फातर्पेकर आणि पाटणकर हे लोकार्पण सोह‌ळयासाठी थांबून राहिल्याने ते शिंदे गटाच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा रंगली होती, परंतु हा कार्यक्रम आटोपून आमदार आणि नगरसेवकांनी मोर्चाचे ठिकाण गाठले. दरम्यान महाविकास आघाडीच्या या मोर्चात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आदी नेते गैरहजर असल्याचे दिसून आले.

( हेही वाचा : इतिहास सांगताना अगाध अज्ञानाचे प्रदर्शन तरी नको; भातखळकरांनी ठाकरेंना स्पष्टच सांगितलं )

महाविकास आघाडीच्यावतीने महापुरुषांचा अवमान, राज्यातील प्रकल्प बाहेर गेले, शेतकरी, बेरोजगारी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आदी विविध प्रश्नांवर शनिवारी मुंबईत हल्लाबोल महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी यापूर्वीच आपण उपस्थित राहणार नसल्याची कल्पना दिली असली तरी यासंदर्भातील बैठकींना अशोक चव्हाण हे उपस्थित असायचे. त्यामुळे चव्हाण यांच्या गैरहजेरीची अधिक चर्चा झाली. याबरोबरच यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीची अधिक चर्चा रंगलेली पहायला मिळाली.

मात्र, हा महामोर्चा सुरु असतानाच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे हे एकाच व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आमदार प्रकाश फातर्फेकर आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी प्रवेश केल्याचीही चर्चा रंगली होती, परंतु काही वेळातच आमदार प्रकाश फातर्फेकर हे महामोर्चाच्या समारोपाच्या ठिकाणी असलेल्या व्यासपीठावर प्रकटलेले दिसले.

चेंबूर येथील हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे लोकार्पण सोहळा हा महापालिकेच्यावतीने आयोजित केला होता आणि नगरसेवकांच्या पाठपुराव्यानंतर हा दवाखाना बनवला जात असल्याने याचे राजशिष्टाचारानुसार खासदारांसह आमदार म्हणून मला व नगरसेवक पाटणकर यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार आम्ही तिथे उपस्थित राहिलो असे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे मला कितीही कोटी रुपये दिले तरी मी कुठेही जाणार नाही आणि मी आजही भाड्याच्या घरात राहतो. त्यामुळे मी उध्दव ठाकरे यांच्यासोबतच आहे आणि राहणार असे त्यांनी स्पष्ट केले. दवाखान्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मी स्वत: मोर्चात सहभागीही झालो होतो,असेही त्यांनी स्पष्ट केले. तर माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी घाटला गाव येथील दवाखाना हा आपल्या प्रयत्नातून उभा राहत असून त्यासाठी आपण जागा मिळवून दिली आहे. त्यामुळे मोर्चाला गेलो असतो तर याचे श्रेय खासदारांना गेले असते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात मी आणि आमदार उपस्थित राहिलो आणि राजशिष्टाचारानुसार महापालिकेने खासदारांनाही निमंत्रित केल्याने आम्ही तिघेही एकत्रित दिसलो असलो तरी आम्ही कुठेही गेलो नाही. उध्दव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत असून कार्यक्रम संपल्यानंतर मोर्चात उपस्थित होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.