कॉलेज विद्यार्थिनीने गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी सांताक्रूझ येथील ‘एसएनडीटी’ महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहात घडली, या घटनेने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.
( हेही वाचा : महाविकास आघाडीच्या नेत्यांचा गर्दीचा दावा ठरला फोल; मोर्चात केवळ ६०-६५ हजार लोकांचा सहभाग)
श्रद्धा लोखंडे (१९) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे, श्रद्धा ही मूळची सातारा जिल्ह्यात राहणारी असून सांताक्रूझ येथील ‘एसएनडीटी’ महाविद्यालयात कॉप्युटर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होती. महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहात राहणाऱ्या श्रद्धाने शुक्रवारी दुपारी तिच्या रूम पार्टनर असलेल्या मैत्रिणीला पोटात दुखत असल्याचे कारण देत मी आज लेक्चरला येणार नसल्याचे सांगत ती रूमवर थांबली होती. दुपारी ३ वाजता रूम पार्टनर मैत्रीण आली व तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला. तिने श्रद्धाला हाक मारली मात्र आतून कुठलीही हालचाल जाणवत नसल्यामुळे मैत्रिणीने दाराच्या फटीतून बघितले असता श्रद्धा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून येताच तिने वसतिगृहातील महिला वॉर्डनला याबाबत कळविले.
महिला वॉर्डनने माहिती घेत, तात्काळ सांताक्रूझ पोलिसांना याबाबत कळवले. सांताक्रूझ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला व श्रद्धाला खाली उतरवून कूपर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी श्रद्धा राहत असलेल्या वसतिगृहाच्या खोलीची झडती घेतली मात्र पोलिसांना कुठेच सुसाईड नोट अथवा संशयास्पद आढळून आले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून श्रद्धाच्या कुटुंबियांना याबाबत कळवण्यात आले आहे.
पोलिसांनी वसतिगृहातील तिच्या मैत्रिणी आणि रूम पार्टनर मैत्रिणीचा जबाब नोंदवून घेतला असून त्यात त्यांनी श्रद्धा ही खूप शांत स्वभावाची होती, ती कधीच कोणासोबत जास्त बोलत नव्हती असे म्हटले आहे. श्रद्धाने आत्महत्या का केली याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नसून तपास सुरु असल्याची माहिती सांताक्रूझ पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community