महाविकास आघाडीने काढलेला मोर्चावेळी शनिवारी मुलीचा लग्नसोहळा असूनही, मुंबई पोलिस आयुक्तांनी रस्त्यावर उतरून पोलिसांचे नेतृत्व केले आणि सर्व काही नियोजनानुसार झाल्याची खात्री केली. मात्र मोर्चासाठी पोलिसांच्या अपेक्षेपेक्षा लोकांची संख्या कमी होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोर्चा ज्या ठिकाणाहून सुरु झाला त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी गोळा झाले होते परंतु मोर्चा सीएसएमटीपर्यंत पोहचता पोहचता हळूहळू मोर्चातील लोक कमी होऊ लागले व सभेच्या ठिकाणी ही संख्या ६० ते ६५ हजारांच्या जवळपास येऊन ठेपली होती.
मोर्चाच्या ठिकाणापासून सभेपर्यंत लोकांची संख्या कमी होत गेली
महाविकास आघाडीने काढलेला ‘हल्लाबोल’ मोर्चामध्ये रस्त्यावर तीन मोठे पक्ष आणि इतर अनेक पक्ष एकत्र आल्याने विक्रमी मोर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, या मोर्चासाठी २ लाखांहून अधिक जनसमुदाय जमेल असा अंदाज पोलिसांना होता. त्यानुसार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी ३१७ पोलीस अधिकारी, १८७० हवालदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या २२ तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, वॉटर कॅनन, सीसीटीव्ही व्हॅन, राखीव पथके अशी एकूण ३० पथके मुंबई पोलीस विभागाच्यावतीने तैनात करण्यात आली होती. तसेच रॅलीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.
आमच्या अपेक्षेनुसार मोर्चासाठी लोकांची संख्या कमी होती, आम्हाला अपेक्षा होती की गर्दी २ लाखांच्या पुढे जाईल आणि ती ३ लाखांपर्यंत पोहोचेल. रिचर्डसन क्रुडास पॉईंटवर सुमारे १ ते १.२५ लाख आंदोलक जमले होते, मोर्चा रॅलीच्या ठिकाणी पोहोचल्याने संख्या कमी होत गेली,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सीएसएमटीजवळ येताच प्रचंड उष्णतेमुळे अनेकांना रॅली सोडावी लागली असेही त्यांनी सांगितले. मोर्चाचा मार्ग लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पूर्वसूचना जारी केली होती, भायखळ्याहून दक्षिण मुंबईकडे जाणारे रस्ते खडा पारसी, नागपाडा जंक्शनवरून वळवण्यात आले होते. तसेच खाली जाणारी वाहतूक पीडीमेलो रोडवरून मेट्रो जंक्शन किंवा ईस्टर्न फ्रीवेकडे वळवण्यात आली होती. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरील नेत्यांचे भाषण संपल्यानंतर १ तासाच्या आत वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे मुंबईतील मोर्चे, आंदोलन, रॅली, राजकीय सभा तसेच इतर राजकीय घडामोडीवर बारीक लक्ष असते, तसेच या मोर्चा, रॅली आणि सभांना किती प्रमाणात गर्दी होऊ शकते याची अचूक आकडेवारी या शाखेकडे असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा मोर्चा लाखोंचा आकडा पार करेल असे सर्वांचा वाटत होते, परंतु ज्यावेळी हा मोर्चा रिचर्ड अँड क्रुडास येथून निघून सीएसएमटी या ठिकाणी दाखल झाला त्यावेळी मोर्चेकऱ्यांची संख्या जवळपास ६० ते ६५ हजार होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मुलीचा विवाह सोहळा सोडून पोलीस आयुक्तांनी प्रथम आपले कर्तव्य बजावले
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीच्या लग्नसोहळ्याच्या व्यवस्थेत व्यस्त होते, शनिवारी लग्नाचा दिवस होता पण फणसळकर यांनी प्रथम आपले कर्त्यव्य बजावत मोर्चा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे नेतृत्व केले आणि मोर्चा संपेपर्यंत ते रस्त्यावर थांबून राहिले. प्रत्येक पित्यासाठी आपल्या मुलीच्या लग्नापेक्षा मोठी कामगिरी कुठलीच नसताना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रथम आपल्या कर्तव्याला महत्व देऊन ते स्वतः मोर्चाच्या ठिकाणी हजर असल्यामुळे मुंबई पोलिसांचे मनोबल अधिकच वाढले.
Join Our WhatsApp Community