राज्यातील पोलीस भरतीसंदर्भात मोठी बातमी आहे. राज्यातील चालक व पोलीस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर त्या-त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार, पुढील दिवस निश्चित करायचे आहे. तर या उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार आहे.
(हेही वाचा – सावधान! तुमच्या फोनमध्ये ‘हे’ बदल झालेत? तर तुमचा फोन हॅक झालाय)
पोलीस भरतीच्या उमेदवारांच्या मैदानी चाचणीच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक शहर-जिल्ह्यात मैदानी चाचणीची तयारी केली जात आहे. पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल त्यानंतर पोलीस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे.
कशी होणार मैदानी चाचणी
दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागांसाठी नेमके किती व कोणत्या संवर्गातील किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाठवली जाणार आहे. मंगळवारी (ता. २०) त्यासंबंधी पोलिस महासंचालक बैठक घेणार असून त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे.
मैदानी चाचणीत ‘सीसीटीव्ही अन् व्हिडिओ’ वॉच
सर्वच उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. त्यातून प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार, लेखी परीक्षेनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी चाचणी व लेखी परिक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून मैदानावर सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा वॉच राहणार आहे. यासह मैदानी चाचणीचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community