मुंबईत शनिवारी महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत शिंदे सरकार फेब्रुवारीपर्यंत कोसळेल असे म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण तर करणारच आणि पुढची विधानसभा निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच लढविणार अशी घोषणाही त्यांनी केली. इतकेच नाही तर पुढची विधानसभा निवडणूक जिंकूही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या महामोर्चात तीन पक्ष एकत्र होते. तिन्ही पक्ष एकत्र येऊन ड्रोन शॉट दाखविता आले नाहीत, तुम्हाला क्लोज शॉट दाखवावे लागले, असे म्हणत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
(हेही वाचा – भारताची हिंदी महासागरातील ताकद वाढणार! भारतीय नौदलात स्वदेशी INS Mormugao दाखल)
जे लोकं देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळीचा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याची टीकाही फडणवीसांनी महाआघाडीवर केली. पुढे ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होत आहे, तसाच हा महामोर्चा देखील नॅनो मोर्चा होता. कोणत्या तोंडाने हे लोक मोर्चा काढत आहेत? महापुरूषांचा अपमान कोणी करू नये आणि कोणी करत असेल तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो आहे, मुद्दे संपले की, अशा कारणांवर मोर्चे काढले जातात.
महाविकास आघाडीतील हे तीनही पक्ष विसरले आहेत की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा काही हे सरकार आल्यानंतर सुरू झालेला नाही, तो वर्षानुवर्षे सुरू आहे. सीमा प्रश्नाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार असल्याच्या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे, कारण सीमाप्रश्न निर्माण करणारा काँग्रेस पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर हे आमचे आराध्य दैवत काल होते, आज आहे आणि उद्याही राहिल असेही फडणवीसांनी ठामपणे सांगितले.