राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून शिंदे सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री दीपक केसरकर हे शिर्डीत दाखल झाले होते. यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून महाराष्ट्राचे कल्याण होऊ दे, असे साईबाबांचरणी साकडे घातले.
(हेही वाचा – पुढची निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वात लढविणार, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास)
साईबाबांच्या दर्शनानंतर केसरकरांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर आहे, ते आता रस्त्यावर उतरले आहे, हे चांगले आहे. मात्र ज्यावेळी लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची संधी होती तेव्हा उतरायला हवे होते, असे म्हणत केसरकरांनी खोचक टोला लगावला.
जेव्हापर्यंत सरकार अस्तित्त्वात होते तोपर्यंत चेहऱ्यावर मास्क होते, पण सरकार गेल्यानंतर दुसऱ्या क्षणी मास्क उतरले असे केल्याने जनतेत चुकीचा मेसेज जातो. आमच्या सारख्या आमदारांना सुद्ध भेट मिळत नव्हती. महाराष्ट्र ठप्प झालेला होता, विरोधी पक्षामध्ये गेल्यावर महाराष्ट्र अॅक्टिव्ह झाला का, असा प्रश्नही केसरकरांनी यावेळी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना केसरकर म्हणाले, कोरोना महामारीतील सर्व देणी आम्ही फेडलीत. राज्य सक्षमपणे चालवावे लागते. केंद्राकडे बोट दाखवून चालत नाही, आमचं सरकार नवीन टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात आणतंय. समृद्धी महामार्गासारखा रस्ता कोकणला जाण्यासाठी होणार आहे. त्यासाठी तुमचे राज्य चालत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Join Our WhatsApp Community