अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती

198

वीर सावरकर यांना दोन जन्मठेपांची जी शिक्षा झाली, त्यात एक फाइल अनंत कान्हेरे, कर्वे आणि देशमुख हे तिघेजण फासावर गेले, त्यावेळीच खरे तर ती फाइल बंद व्हायला हवी होती. पण ती केवळ आणि केवळ वीर सावरकर यांच्यासाठी उघडी ठेवण्यात आली होती. आणि त्याप्रमाणे त्यांना पकडून त्यांच्यावर तोही एक आरोप लावला होता, खुनाच्या कटामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे सरकारमध्ये अप्रीती पसरवणे थोडक्यात राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या दोन स्वतंत्र केसेस जाणीवपूर्वक चालवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये २५-२५ वर्षे अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्यानंतर त्यावेळी वीर सावरकर यांना जरी बॅरिस्टर पदवी दिली नसली, तरी त्यांच्या मनातला बॅरिस्टर जागा होताच ना. म्हणून त्यांनी सरकारकडे आवेदन करून विचारले की, या दोन्ही शिक्षा एकदम भोगायच्या आहेत का? कारण एकदम भोगायच्या याचा अर्थ शिक्षा २५ वर्षांचीच होते. त्यावर सरकारने उत्तर दिले की, एक शिक्षा पूर्ण झाली की दुसरी शिक्षा भोगायची आहे. त्यावर वीर सावरकर म्हणाले की, ब्रिटिश सरकारचा हिंदूंच्या पुर्नजन्मावर विश्वास आहे. कारण इतका दीर्घकाळ शिक्षा भोगून कुणी जिवंत राहू शकत नाही. म्हणजे पुढच्या जन्मी शिक्षा भोगायची का, असा मार्मिक प्रश्न उपस्थित केला. तत्पूर्वी ५० वर्षांची शिक्षा झालेला एक कैदी अंदमानात होता. अर्थात तो कोठडीच्या बाहेर राहत होता, कारण जेलच्या कायद्यात तशी तरतूद होती. ३ वर्षे कोठडीत घालवल्यावर त्या कैद्याला कोठडीच्या बाहेर सोडले जायचे. वीर सावरकर यांना मात्र ही तरतूद लागू केली नाही. त्यांना कोठडीच्या बाहेर काढलेच नाही. म्हणून वीर सावरकर यांनी त्या ठिकाणी ज्या प्रकारचे काव्य लिहिले आहे, ते जर आपण वाचले तर एकीकडे वीर सावरकर अध्यात्मातील संकल्पना सहजपणे वापरतात, हे दिसून येते. तिथेच राहून ते उर्दू शिकले. आणि ‘हम ही हमारे वाली है’, या सारखी ते कविता लिहितात, त्याच वेळी ते श्रीराम आणि श्रीकृष्णाचा उल्लेख ज्याप्रकारे त्या काव्यामध्ये करतात, हे सगळे आपण जेव्हा वाचतो त्या वेळेला त्यांची तिथे असलेली मानसिकता आपल्याला कळते.

क्रांतिकारक आणि अतिरेकी यांच्यातील फरक समजून घ्या!

आजकाल काहीजण विचारतात, मग काश्मीरसाठी जे लढतात, त्या अतिरेक्यांना आपले सरकार अतिरेकी का म्हणते? ते तर काश्मीरच्या आझादीचा लढा देत आहेत. असे म्हणणे हा भोंगळपणा आणि मूर्खपणाचा युक्तीवाद आहे. कारण आपल्याकडील क्रांतिकारकांनी आपल्याच लोकांवर हल्ले केले नाहीत. आपल्याच पोरी बाळींवर बलात्कार केले नाहीत. अकारण कुणाला कौर्याने मारलेले नाही. लोक जिथे जमा होतात तिथे जाणीवपूर्वक बाँबस्फोट करून अनेकांचा मृत्यू घडवलेला नाही. हे काहीही क्रांतिकारकांनी केलेले नाही, दहशतवादी मात्र हे सगळे करतात. त्यामुळे दहशतवादी आणि क्रांतिकारक यांच्यातील मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे.

कारागृहातील वीर सावरकरांच्या काव्याचा अन्वयार्थ

क्रांतिकारक आणि अध्यात्मिकवृत्तीचा माणूस यांच्यातील असलेले साम्य समजून घेतले पाहिजे. म्हणून क्रांतिकारक हा अध्यात्मिक वृत्तीचा असू शकतो, याचे ठळक उदाहरण म्हणजे ज्यांची नुकतीच झालेली जयंती ते अरविंद बाबू. तेे क्रांतिकारक होते, तेच पुढे जाऊन योगी अरविंद घोष झाले. सुभाष बाबू नेहमी म्हणायचे की माझे पहिले प्रेम हे अज्ञेयाचा शोध घेणे. कारण क्रांतिकारक व अध्यात्मिक वृत्तीचा पुरुष किंवा संत यांच्या धारणा एकच असतात. दोघांचाही एकाच दिशेने प्रवास असतो. एकाचा स्वराज्याच्या दिशेने प्रवास होता, तर दुसऱ्याचा ईश्वरप्राप्तीसाठीचा प्रवास होता. दोघांचेही मार्ग खडतर होते आणि दोघांनाही ते ठाऊक होते. त्या मार्गावरून चालताना आपल्याला त्रास होणार हेही त्यांना माहित होते. तो त्रास सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती आणि आपला देह या मार्गावरून चालताना संपू शकतो, याची जाणीवही होती. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे क्रांतिकारक हा अध्यात्मिक धारणेचा सहज होऊ शकतो, ते जर आपण लक्षात घेतले, तर वीर सावरकर यांच्या काव्यामध्येही याची आपल्याला झलक दिसते.

महाराष्ट्राची बदनामी होत नाही का?

वीर सावरकर यांनी त्यांना झालेली भयंकर शिक्षा ती ११ वर्षे अंदमानात कशी भोगली, त्या पुढील २-३ वर्षे त्यांनी अलीपूर आणि रत्नागिरीत शिक्षा भोगली, त्याचा पुढचा काळ स्थानबद्धतेत कसा घालवला, हे एकदा नीट समजून घेतले, तर वीर सावरकर यांच्यावर जे निरर्थक आरोप होत आहेत, त्या आरोपातील फोलपणा लक्षात येतो. वाईट याचे वाटते की, काही मराठी माणसेच वीर सावरकर यांच्यावर ज्या वेळेला वाटेल तसे आरोप करतात आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या बदनामीचे राजकारण करतात, त्यावेळी आपण वीर सावरकर यांच्यासारख्या ज्यांनी आपले अख्खे आयुष्य देशसेवेसाठी घालवले त्या माणसावर वाटेल ते आरोप करून महाराष्ट्राची बदनामी करत नाही का, एव्हढाच विचार करावा, असे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

डॉ. सच्चिदानंद शेवडे (लेखक राष्ट्रीय प्रवचनकार आहेत.)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.