स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दृष्टीकोनातून धर्म आणि अधर्म

175

सुषमा अंधारे यांचे काही जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यात त्यांनी हिंदू देवतांवर आणि संतांवर गलिच्छ टीका केली आहे. टीका करण्याचा त्यांचा हेतू शुद्ध नाही. हिंदू धर्म वाईट आहे, या हेतूने त्यांनी टीका केली आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात देखील हिंदू धर्माची चिकित्सा झाली आहे. त्या काळी अनेकांनी हिंदू धर्म, देव, संत यांच्यावर टीका केली आहे. परंतु इतरांनी केलेल्या टीकेमध्ये आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या टीकेमध्ये अंतर आहे.

तत्कालीन हिंदू हा राजकीय दृष्ट्या मागासलेला होता. हिंदूंच्या राजकीय गरजा नव्हत्या, हिंदू अहिंसेला बळी गेला होता. त्यामुळे वीर सावरकरांनी हिंदूंना सशक्त व सक्षम करण्यासाठी टीका केली आहे. त्यामागे त्यांचा हेतू शुद्ध होता. सावरकर स्पष्ट आणि परखडपणे म्हणतात, ‘धर्म संस्कारात ज्या ज्या क्रिया धार्मिक म्हणून चिरस्थायित्व पावतात, त्या बहुधा त्या त्या काळचा इतिहास असतात, भूगर्भित स्तरांतून जशी त्या त्या काळची सृष्टी स्थिती नि समाजस्थिती चिरेबंद करुन टाकलेली असते, तसेच धार्मिक संस्कारातून त्या त्या काळचे ज्ञान नि अज्ञान अस्थि-स्थिर चिरेबंद नि चिरंतन करुन ठेवले आहे.’

धार्मिक सुधारणा करण्याचा आग्रह

सावरकरांचं असं म्हणणं होतं की काळानुसार सुधारणा होईल असे समजून गप्प बसून चालणार नाही. ते म्हणतात, ‘ज्या गोष्टी घडाव्या असे आपणांस वाटते त्यासाठी तीव्र प्रयत्नांची आवश्यकता असते.’ ‘सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवस सुद्धा टिकणार नाही.’ असेही त्यांचे मत होते. त्यामुळे त्या त्या काळी धार्मिक सुधारणा झाल्याच पाहिजेत ही सावरकरांची धारणा आहे. म्हणून त्यांनी धार्मिक प्रथांवर टीका केली. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इतरांप्रमाणे सूड उगवण्यासाठी, धर्माला बदनाम करण्यासाठी किंवा धर्म नाकारण्यासाठी सावरकरांनी धर्मावर टीका केली नाही. सावरकर म्हणतात, ‘मागच्या परिस्थितीत एखादी रुढी उपयुक्त असली किंवा त्या काळच्या भौतिक ज्ञानाच्या मानाने एखादा सिद्धांत बरोबर वाटला, पण जर ती रुढी आज समाजास हानिकारक ठरत असेल वा तो सिद्धांत वाढत्या भौतिक नि प्रयोगसिद्ध ज्ञानाने खोटा पडत असेल तर ती रुढी बदलण्यात वा तो सिद्धांत मानण्यात पूर्वजांचा काहीही अपमान होत नसून त्यात आमचा नि त्यांचा गौरवच आहे.’ धर्मात सुधारणा केल्याने तो अधर्म ठरत नाही. उलट तो धर्म चिरंजीव राहतो. बाहेरच्या देशात निर्माण झालेल्या इतर पंथांमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये हाच मोठा फरक आहे. तिथे बदल करण्याला विरोध आहे आणि इथे काळानुसार सतत बदल होत राहिल्यामुळे सगळे सुखी आहेत. सावरकर म्हणतात, ‘‘ज्या रुढीच्या योगे लवलेश सामाजिक असा लाभ न होता मनुष्यमात्रास निष्कारण त्रासच त्रास होतो तो ‘अधर्म’ होय!’’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.