नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सत्राला सोमवार, १९ डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. सभागृहातील सर्व सदस्यांना नव्या लॅपटॉपसह, वायफाय व अन्य विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सत्रातील उपलब्ध सुविधांबाबतचे नवे कोरे ॲप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक सदस्यांकडे उपलब्ध केलेली डिजिटल माहिती पुस्तिका यामुळे यावेळेचे अधिवेशन अधिक हायटेक व नवीन सुविधांसह सुरू होत आहे.
( हेही वाचा : वीर सावरकर कराटे अॅकेडमीच्या नारायणी आणि कशिशने जिंकले सुवर्णपदक!)
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा रविवारी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या बैठकीला विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह विधिमंडळ सचिवालय,संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विधानभवन परिसर आणि बाहेरील व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. ट्रॅफिक आणि पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. विधिमंडळ परिसर आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. महिला पोलिसांसाठी विशेष काळजी घेण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले.
महिला आमदारांसाठी विधानभवनात शिशू संगोपन कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले. याशिवाय विधानसभा अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनेनुसार पत्रकारांसाठी अतिरिक्त कक्ष उभारण्यात आला आहे. इलेक्ट्रानिक्स माध्यमांसाठी वेगळी जागा उपलब्ध करण्यात आली आहे.
महा असेंम्बली ॲप
- अधिवेशनासाठी येण्यासाठी व जाण्यासाठी रेल्वे आणि विमान प्रवासासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी केल्या. विमानाच्या अतिरिक्त फेऱ्या सुटीच्या दिवसांमध्ये वाढविण्याची सूचना त्यांनी केली.
- रेल्वे अधिकाऱ्यांकडून त्यांना रेल्वेच्या परतीच्या प्रवासाची माहिती घेतली. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सेटट्राईब ह्या आयटी कंपनीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “महा असेंम्बली” या ॲप चे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
- या ॲपद्वारे सर्व मंत्री, आमदार, सचिव स्तरावरील पदाधिकारी यांना अधिवेशनादरम्यान त्यांची निवास व्यवस्था, अधिवेशन दैनंदिनी, महत्वाच्या व्यक्तींची टेलिफोन निर्देशिका, इतर महत्वाचे सहाय्य, विविध बैठकांचा तपशील एका क्लिक वर मिळू शकणार आहे.
- अँड्रॉइड ॲप, वेब व्यू तसेच ॲपल स्टोरवर हे ॲप उपलब्ध असणार असून फक्त अधिकृत वापरकर्त्यानाच अर्थात सदस्यांनाच या ॲपचा एक्सेस असणार आहे.
१५ मिनिटांत तक्रारीचा निपटारा
याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थळदर्शक गुगल नकाशा असलेली माहिती पुस्तिका प्रत्येक सदस्यांच्या कक्षामध्ये व स्विय सहाय्यकांकडे उपलब्ध करुन दिली आहे. डिजीटल हाऊस किपींग, कपडे धुणे, भोजन सेवा, मदतनीस सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. याशिवाय निवास व अन्न बाबतीत असणाऱ्या कोणत्याही तक्रारीचा निपटारा 15 मिनिटात करण्याची तयारी विभागाने ठेवली आहे.
Join Our WhatsApp Community