महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी आधिवेशन आज, सोमवारपासून नागपुरात सुरू झाले असून अधिवेशनाचा पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या चर्चेच्या विषय ठरत आहेत. कारणही तसेच विशेष आहे. अवघ्या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन त्यांनी विधनभवनात हजेरी लावली. इतकेच नाही तर हा क्षण सुखदः असल्याचेही त्यांनी सांगितले.
मी एक आई असून यासोबतच नाशिकच्या देवळाली मतदारसंघातील आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्य महत्त्वाची आहेत. बाळ अडीच महिन्यांचे असल्याने माझ्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे त्याला सोबत घेऊन मी अधिवेशनासाठी आली आहे. मला मतदारसंघातील लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, माझ्या मतदारसंघाला न्याय मिळावा म्हणून त्याला घेऊन यावे लागले, अशी भावना अहिरे यांनी व्यक्त केली.
अडीच महिन्याचं बाळ अधिवेशनात
या बाळाचे नाव प्रशंसक प्रवीण वाघ असे असून ३० सप्टेंबर रोजी त्याचा जन्म झाला आहे. यानंतर अधिवेशन आल्याने पहिल्यांदाच या बाळाला घराबाहेर घेऊन सरोज अहिरे, त्यांचे पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात दाखल झालेत. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. यावेळी कुटुंबीय बाळाला सांभाळतील तर मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस सुरू असेल याबद्दल माहिती नाही, पण लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
समृद्धी महामार्गाने चिमुकला थेट नागपूरात
पुढे त्या असेही म्हणाल्या की, जगासह देशभरातील अनेक महिला अशा दोन्ही गोष्टी सांभाळून आपले कर्तव्य बजावत असतात. प्रशंसक लहान आहे, माझ्याशिवाय तो राहत नसल्याने त्याला इथे घेऊन आली आहे. जेवढे शक्य असेल तेवढे अधिवेशन अटेंड करून मतदारसंघातील प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी मी इथे आलेली आहे. प्रशंसकच्या जन्मानंतर पहिल्यांदाच त्याला बाहेर आणले असून तो थेट नागपूर समृद्धी महामार्गाने नागपूरात आलेला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य आहे, ते बजावणं आवश्यक आहे. तर दुसरीकडे आई म्हणून जे कर्तव्य आहे ते देखील पूर्ण करायचे असल्याचं मत सरोज अहिरे यांनी व्यक्त केले आहे.
Join Our WhatsApp Community