रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दगावले मूल, नर्ससह दोघांना अटक

149

रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुंबईतील पूर्व उपनगरात घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टरसह चार जणांविरुद्ध सदोष मनुष्यवध आणि वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नर्ससह दोघांना अटक केली आहे.

( हेही वाचा : मालाडमध्ये मलवाहिनी टाकण्याच्या कामांमध्ये मविआकडून आडकाठी : भाजप नगरसेवकाचा उपोषणाचा इशार)

नागपूर येथे राहणारे सोहेल शहजाद हुसेन (२८) यांचा विवाह गोवंडी शिवाजी नगर येथे राहणाऱ्या राबिया हिच्यासोबत वर्षभरापूर्वीच झाला होता. राबिया ही गर्भवती होती, व पहिले बाळंतपण असल्यामुळे ती माहेरी गोवंडी शिवाजी नगर येथे आलेली होती. शिवाजी नगर, अहिल्याबाई होळकर मार्ग या ठिकाणी असलेल्या आर. एन. मेमोरियल हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात तिने नाव नोंदविले होते. १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राबियाला प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे पती सोहेल तिला घेऊन आर.एन. मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घेऊन आला.

रुग्णालयातील डॉक्टर मेहताब यांनी बाहेरून सोनोग्राफी करण्यास सांगितले, सोनोग्राफी केल्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा राबियाला रुग्णालयात आणण्यात आले, डॉक्टर मेहताब यांनी राबियाला प्रसूती वॉर्डमध्ये दाखल करून घेतले, व तिला नर्स सोलिया आणि डॉक्टरांनी काही इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या, त्यानंतर काही वेळाने राबिया ही बाळंत झाली.

तिने मुलीला जन्म दिला, मात्र जन्मलेल्या मुलीची काहीही हालचाल नव्हती व तिच्या हृदयाचे ठोके कमी होत असल्यामुळे डॉ.मेहताब यांनी मुलींवर कुठलेही उपचार न करता जवळच असलेल्या मुस्कान रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. आरएन मेमोरियल रुग्णालयाकडून मुलीला कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन मास्क न लावता रुग्णवाहिका न देता मुलीला घेऊन जाण्यास सांगितले असल्यामुळे सोहेल हा रिक्षाने मुस्कान हॉस्पिटलमध्ये नुकत्याच जन्मलेल्या मुलीला घेऊन आला, परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून मुलीची प्रकृती नाजुक असल्याचे सांगून तिला तात्काळ राजवाडी येथे हलविण्यास सांगितले.

सोहेल रिक्षानेच मुलीला घेऊन राजावाडी रुग्णालयात आला, तेथील डॉक्टरांनी मुलीला तपासून ती मृत झाल्याचे निदान केले. राजावाडीतील डॉक्टरांनी आरएन मेमोरियल रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून नवजात मुलीला रुग्णवाहिकेशिवाय कसे पाठवले असे विचारले असता डॉ.मेहताब यांनी फोन बंद करून रुग्णालयातून पळ काढला. याप्रकरणी सोहेल हुसेन याने शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून आर एन मेमोरियल हॉस्पिटल, डॉक्टर मेहताब जाकीरअली खान, अल्ताफ खान, जाकिरअली खान, नर्स सोलिया राजू खान यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्ताफ खान आणि सोलिया या दोघांना अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.